सहा नगरपालिकात कॉंग्रेसचा "हात' नाही

सहा नगरपालिकात कॉंग्रेसचा "हात' नाही
सहा नगरपालिकात कॉंग्रेसचा "हात' नाही

स्थानिक पातळीवर आघाडी : कुरूंदवाडमध्ये सर्व, इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये काही जागां चिन्हावर

कोल्हापूर :  एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीत केवळ तीनच नगरपालिकेत कॉंग्रेसचे उमेदवार पक्षाच्या "हात' या चिन्हावर रिंगणात आहेत. उर्वरित सहा नगरपालिकेत पक्षाचे चिन्ह दिसत नाही. नेत्यांनी स्थानिक आघाड्यांशी मिळतेजुळते घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.


गडहिंग्लज नगरपालिकेत राष्ट्रवादीसोबतची आघाडी शेवटच्या क्षणी फिसकटल्याने याठिकाणी केवळ चार उमेदवार पक्षाचे "हात' चिन्ह घेऊन रिंगणात राहीले आहेत. इचलकरंजीत कॉंग्रेसची राष्ट्रवादी व मदन कारंडे गटाशी आघाडी आहे, एकूण 62 जागांपैकी 40 जागांवर पक्षाचे अधिकृत्त उमेदवार रिंगणात आहेत. कुरुंदवाडमध्येही कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व 17 जागा पक्षाचे उमेदवार "हात' चिन्हावर लढवत आहेत.


कागल तालुक्‍यात माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या गटाने लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतल्याने या तालुक्‍यातील कॉंग्रेसचे अस्तित्त्व संपुष्टात आले. त्यामुळे या तालुक्‍यातील मुरगुड व कागल नगरपालिकेत पक्षाचे अस्तित्त्व शून्य आहे. पक्षाचे तालुकाध्यक्षच कोठे आहेत याचा पत्ता नाही, त्यामुळे या दोन नगरपालिकांत कॉंग्रेसचा उमेदवार दिसणेही अशक्‍य होते, परिस्थितीही तशीच आहे. पेठवडगांवमध्ये कॉंग्रेसचे दोन नेते वेगवेगळ्या आघाडीसोबत आहेत. आमदार सतेज पाटील यांनी यादव आघाडीला तर कॉंग्रेसचे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी युवक क्रांती आघाडीला पाठिंबा दिला आहे. जयसिंगपूरमध्ये कॉंग्रेसची राष्ट्रवादीसोबत आघाडी आहे, पण दोघांचेही उमेदवार पक्षाच्या चिन्हावर रिंगणात नाहीत. मलकापूर, पन्हाळा नगरपालिकेत आत्तापर्यंत कॉंग्रेसने कधी चिन्हावर निवडणूक लढवली नव्हती, दोन्ही तालुक्‍यात पक्षाचा आवाकाच फारसा नसल्याने यावेळीही या दोन नगरपालिकेत "हात' गायब आहे.


विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची जिल्ह्यात दाणादाण उडाली असताना या निवडणुका पक्षवाढीसाठी एक चांगला पर्याय होता. पण प्रत्येक नगरपालिकानिहाय नेते व आघाड्यांचे सोयीचे राजकारण, वरिष्ठ नेत्यांचे निवडणुकीकडेच दुर्लक्ष आणि ऐनवेळी राष्ट्रवादीशी तुटलेले संबंध यामुळे जिल्ह्यातील नऊपैकी सहा नगरपालिकात राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे "हात' हे चिन्ह दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com