कोरोना इफ्फेक्ट : बांधकाम क्षेत्राचा गाडा पळेल, पण हळू हळू 

 The construction cart will run, but slowly
The construction cart will run, but slowly

भारतात शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून बांधकाम दुसऱ्या क्रमांकांवर आहे. अडीचशेंवर उद्योग बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहेत. कोरोना आपत्तीने बांधकामे तात्पुरती ठप्प झाली, मात्र त्याचे परिणाम दीर्घकालीन असतील. लॉकडाऊन शिथील होईल तसतसा पुन्हा एकदा गाडा रुळावर येत आहे. मात्र हा गाडा पुर्णांशाने पुर्वपदावर येईल का, मुंबई पुण्यानंतर सांगलीसारख्या शहरांना विकासाची संधी येईल का, या प्रश्‍नांचा घेतलेला हा वेध. 

सिमेंट-स्टीलची दरवाढ 
सध्याच्या घडीला बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत असं नाही. मात्र हळू हळू ती सुरु झाली आहेत. गेल्या दीड महिन्याच्या खंडानंतर बांधकामे सुरु होत असताना बांधकाम साहित्याच्या दरात अपेक्षेप्रमाणे वाढ झाली. सिमेंटच्या पोत्यामागे शंभर रुपयांची म्हणजे पावणेचारशे रुपये इतका प्रति पोत्याचा दर झाला आहे. स्टीलचा दरही प्रति टन चार हजारांनी वाढून म्हणजे सुमारे चाळीस हजार रुपये झाला. या दोन्हीमध्ये कंपन्यांची मक्तेदारी असल्याने संघटीतपणे दरवाढ होत असल्याचा पुर्वानुभव आहे. आत्ताही तसेच झाले. मात्र आता पुढील वर्षभर ते दर वाढतील असे मात्र नाही. त्यात झाली तर घटच व्हायची शक्‍यता आहे. 

नव्या प्रकल्पांना ब्रेक 
सांगलीसह जिल्हाभरात आजघडीला सुरु असलेले बांधकाम प्रकल्प पुर्ण करण्यास व्यावसायिकांचा प्राधान्यक्रम असेल. त्याबरोबरच नव्याने बांधकाम प्रकल्प तातडीने सुरु होण्याची शक्‍यता नाही. बाजारपेठेचा कल पाहूनच नव्याने बांधकाम प्रस्तावित होतील असे दिसते. विशेषतः बाजारपेठेतील मंदीचे चित्र पाहता पुढील सहा महिने तरी प्रस्तावित प्रकल्प पुढे जातील असे सध्याचे चित्र आहे. 

बांधकामे रखडतील ? 
परराज्यातील कामगारही आपल्या गावी परतण्याच्या मार्गावर असल्याने त्यांच्या अभावी बांधकामाचे प्रकल्प रखडले जाण्याची भीती आहे, मात्र जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रात परप्रांतियांचे सुमारे तीस टक्के इतकेच प्रमाण आहे. विशेषतः फरशीकाम, फर्निचर यातच प्रामुख्याने बाहेरील कामगार आहेत. कामगार परतले तरी ते महिनाभरात पुन्हा दाखल होतील त्यामुळे सुरु असलेली बांधकामे रखडणार नाहीत. 

सांगलीवर फोकस येईल ? 
केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आपल्या ताज्या वेबीनारमध्ये सांगलीसारख्या शहरांना कोरानानंतरच्या जगात विकासाच्या संधी असतील, असे सांगितले. त्याचा मतितार्थ इतकाच होता की जगभरातील उद्योजक जेव्हा चीननंतर उद्योग विस्तारासाठी भारतास प्राधान्य देतील आणि त्यातही पुण्या-मुंबईपेक्षाही ते सांगलीकडे येतील. अर्थात हा एक आशावाद आहे. अंतिमतः जिथे रोजगारांच्या संधी त्या शहरांतच बांधकाम क्षेत्राचा विस्तार झालेला दिसून येतो. ही दिर्घकालीन प्रक्रिया आहे. 

बांधकामांना उभारी कधी? 
बांधकाम क्षेत्राला वेग घेण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो, असे तज्ज्ञांना वाटतेय. अर्थव्यवस्था उभारी घेतल्यानंतरच सकारात्मक परिणाम बांधकाम क्षेत्रावर दिसणार आहेत. सध्याच्या घडीला स्थावर मालमत्तांच्या किंमती स्थिर आहेत किंवा काही अंशी घटल्याही आहेत. तसेच दुसरीकडे रेपो दरही नीचांकी पातळीवर असल्याने गृहकर्ज घेण्यासाठी सोयीचे वातावरण आहे. सध्या एचडीएफसी बॅंकेने 7.85 टक्के इतका निचांकी गृहकर्जाचा व्याज दर जाहीर केला आहे. त्यामुळे ज्यांची ऐपत आहे त्यांना घरखरेदीचा निर्णय करण्यासाठी घटलेले व्याजदर हा बुस्टर ठरू शकतो. स्थावर मालमत्तांच्या किंमतीही 2 ते 9 टक्के इतक्‍या घटतील असा अंदाज असून त्यामुळे भविष्यात नव्या बांधकामाचे दर स्थीरच राहतील असा अंदाज आहे. अनेक बॅंका स्वतःहून आपल्या जुन्या चांगल्या कर्जदारांना शोधून त्यांना फोन करून कर्ज घेण्याची विनंती करीत आहेत. 

किंमती आणखी कमी होतील ? 
कोरोनाचा कहर पुर्ण थांबल्याशिवाय बांधकाम क्षेत्रातही स्थैर्य येण्याची शक्‍यता नाही. स्थावर मालमत्तांच्या किंमतीत घट झाली तरच बांधकामांचे दर घटतील. बांधकाम क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ तसा अंदाज व्यक्त करीत आहेत. बांधकाम क्षेत्र संपूर्ण लॉकडाऊन थांबण्याची वाट पाहते आहे. नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सीलच्या मते घरांच्या किंमती 10 ते 15 टक्के कमी होऊ शकतात. सांगलीसारख्या शहरांमध्ये हा परिणाम किती होईल हे काळाच्या ओघातच स्पष्ट होईल. 

फ्लॅट बुकचा कल आता सांगलीकडे

कोरोना आपत्तीतील एक संधी म्हणजे सध्या पुण्यामध्ये गुंतवणूक म्हणून फ्लॅट बुक करण्याकडे असलेला कल आता सांगलीकडे असू शकेल असे वाटते. कोरोनाच्या टाळेबंदीत ग्राहकांकडून झालेल्या चौकशीतून हा निष्कर्ष पुढे येतो.

- दीपक सूर्यवंशी, राज्य कार्यकारणी सदस्य, क्रेडाई 

... तरच कोरोना आपत्ती नव्हे इष्टापती ठरेल.

आता शहरातील लोकसंख्येचे विकेंद्रीकरण व्हायची शक्‍यता आहे. ओघानेच बांधकाम क्षेत्राचेही तसे होऊ शकते. मात्र छोटी शहरे, गावांच्या अर्थकारणाचा विचार करता त्यांच्यासाठी परवडणारी घरे देणारी व्यवस्था मात्र उभी करावी लागेल. पर्यावरण पुरक, स्थानिक संसाधनांचा वापर करूनच अशी घरी उभी राहू शकतात. तसे झाले तर कोरोना आपत्ती नव्हे इष्टापती ठरेल.

- प्रवीण माळी, वास्तुरचनाकार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com