सांगलीत वादग्रस्त घनकचरा प्रकल्प अखेर रद्द 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

दैनिक "सकाळ'ने गेले काही महिने या संपुर्ण निविदा प्रक्रियेतील त्रुटी दाखवत यातील संभाव्य गैरव्यवहार उघडकीस आणला होता.

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे हित डालवणारा वादग्रस्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली. सत्ताधारी भाजपनेच आज स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला. दैनिक "सकाळ'ने गेले काही महिने या संपुर्ण निविदा प्रक्रियेतील त्रुटी दाखवत यातील संभाव्य गैरव्यवहार उघडकीस आणला होता. त्यातून निर्माण झालेल्या लोकभावनेचा आदर करीत आम्ही ही प्रक्रिया रद्द करून लवकरच नवीन निविदा प्रक्रिया राबवत आहोत असे आज भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

गेले काही महिने घनकचरा प्रकल्पासाठी महापालिकेत पडद्याआड बऱ्याच घडामोडी सुरु होत्या याला कारण महापालिकेकडे या प्रकल्पासाठी स्वतंत्रपणे 40 कोटींची रक्कम राखीव होती. या निधीवर डोळा ठेवून महापालिकेचे आर्थिक हित खड्डयात घालून हा प्रकल्प प्रशासनाने पुढे रेटला होता. सकाळने प्रारंभपासून या प्रकरणी जागल्याची भूमिका घेत यातील संभाव्य गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला. भाजप ेनेत्यांनी गेल्या 14 जुलैला उघडपणे पत्रकार परिषद भाजप ही निविदा प्रक्रिया रद्द करेल असे जाहीर केले मात्र त्यानंतरही आयुक्त नितिन कापडणीस यांनी निविदा उघडणारच असे सांगत भाजप नेत्यांनी कवडीची किंमत देत नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. हा विषय स्थायीच्या अजेंड्यावर घेत सभापती संदिप आवटी यांनीही भाजपनेत्यांना आव्हान दिले मात्र अखेर पक्षातील सर्व सदस्यांचा वाढता विरोध लक्षात आल्यानंतर आज आवटी यांनी माघार घेतली. त्याआधी गेले दोन दिवस बैठकांचे सत्र सुरु होते. 
आज या निर्णयाची माहिती देण्यासाठी भाजपचे महापालिकेतील नेते शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील यांनी पत्रकार बैठक घएतली. यावेळी उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी समिती सभापती संदीप आवटी उपस्थित होते. 

आयुक्तांनी निविदा उघडल्यानंतर त्या अंतिम मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवल्या होत्या. त्याला सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेसच्या सदस्यांनी स्थायी समितीमध्ये विरोध केला. मात्र राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी पाठिंबा दर्शवला होता. शुक्रवारी झालेली स्थायी समिती सभा या विषयावरुन तहकूब करण्यात आली होती. ती आज दुपारी झाली. यामध्ये निविदेत त्रुटी असल्याचे कारण सांगत प्रक्रिया रद्द करुन नव्याने फेर निविदा काढून हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री. इनामदार आणि दिनकर पाटील यांनी दिली. 

ते म्हणाले, प्रकल्प यशस्वी होण्याच्या दृष्टीने काही त्रुटी निविदेत होत्या. तसेच सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांनीही यातील त्रुटींकडे लक्ष वेधले. विरोधी पक्षनेत्यांनीही या प्रकल्पाला विरोध केला. हे सर्व लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प आवश्‍यक असून भविष्यात त्यातील सर्व त्रुटींचा अभ्यास करुन तसेच सामाजिक संस्था, यातील तज्ज्ञांशी चर्चा करुन त्यांचे मार्गदर्शन घेऊन या प्रकल्पातून महापालिकेला उत्पन्न कसे मिळेल अशा पध्दतीने फेरनिविदा काढून प्रकल्प राबवण्यात येईल. 

"सकाळ'चा पाठपुरावा 
महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पातील फोलपणा "सकाळ'ने यातील त्रुटींपासून दाखवला होता. तसेच या प्रकल्पामुळे महापालिकेला एक रुपयाचेही उत्पन्न न मिळता ठेकेदाराचेच फक्त भले होणार असल्याचे तज्ज्ञांशी चर्चा करुन मांडले. सत्ताधारी भाजप नेत्यांच्या बैठकीत सकाळमधील बातम्या दाखवत सदस्यांनी सभापती आवटी यांना महापालिकेचे हित कसे होणार असा प्रश्‍न केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Controversial solid waste project in Sangli finally canceled