सांगली : ‘जीवन ज्योत’च्या रुग्णालय जागेवरून पालिकेत वादंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 सांगली

सांगली : ‘जीवन ज्योत’च्या रुग्णालय जागेवरून पालिकेत वादंग

सांगली - येथील ओव्हरसियर कॉलनीतील भूखंड कर्करोगावरील रुग्णालय उभारणीसाठी मुंबईच्या खासगी जीवन ज्योत ट्रस्टला देण्याच्या निर्णयाबाबत महापालिकेत वादंग उठले आहे. स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी न्यायालयात जायचा इशारा दिला आहे. प्रशासनाने मात्र जागा हस्तांतरणाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू ठेवली आहे. सध्या या जागेवर पालिका शिक्षण मंडळाचे कार्यालय व शाळा क्रमांक सहाची पडीक इमारत आहे. भूमापन क्रमांक ५०० मधील एकूण १० हजार ३५५ .१० चौ.मी. पैकी १५१३ चौ.मी. इतकी जागा देण्यात येणार आहे. त्यासाठी नगररचना व मालमत्ता विभागांचे अनुकूल अभिप्राय आले आहेत. हा जागा सार्वजनिक निमसार्वजिनक वापरासाठी आरक्षित आहे. त्याआधारे पूर्वी इथे शाळा होती. आता तेथील काही भागात रुग्णालय सुरू केले जाऊ शकते असा अभिप्राय आहे.

त्याआधारेच प्रशासनाने प्रस्ताव तयार करून महासभेनेही ठराव मंजूर केला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजनही झाले आहे. संबंधित जीवन ज्योत ट्रस्ट मुंबईतील सेवाभावी संस्था आहे. या संस्थेचा आरोग्य सेवा क्षेत्रात चांगला लौकिक आहे. या ट्रस्टचे व्यवस्थापक हारखचंद सावला व महापालिकेच्या वतीने आरोग्यअधिकारी सुनील आंबोळे यांच्यात करारपत्रही पूर्ण झाले आहे. शहरासाठी रुग्णालयासारखी गरजेची गोष्ट होत असताना जागेच्या मुद्यावरून वाद उभा राहिल्याने रुग्णालयाच्या उभारणीबाबत सांशकता निर्माण झाली आहे.

करार काय?

  • १५१३ चौरस मीटरचा भूखंड २९ वर्षांसाठी दिला जाणार

  • कर्करोग उपचार, डायलेसीस सेंटर, पॅथॉलॉजी सेंटर उभारणार

  • आरोग्य सेवेसाठीचे शुल्क नाममात्र बाजारभावापेक्षा कमी असेल.

  • आयुक्त हे दर कमी असल्याची खात्री करून मान्यता देतील.

  • रुग्णालयाच्या दैनंदिन कारभाराशी पालिकेचा कोणताही संबंध नसेल.

आक्षेप काय?

  • शाळा भूखंडाच्या जागेचा वापर बदलण्यात आला.

  • कर्करोग उपचारात होणारा किरणोत्सार वस्तीसाठी घातक.

  • विकसित भागाऐवजी संजयनगरला रुग्णालय अधिक गरजेचे.

  • स्थानिक हौसिंग सोसायटीचे मत विचारात न घेताच निर्णय.