सांगली जिल्ह्यात 22 शिक्षकांना कोरोना; शाळा सुरु होण्याआधी धक्का

अजित झळके
Sunday, 22 November 2020

जिल्ह्यातील 6 हजार 249 शिक्षकांच्या तपासण्या करण्यात आल्या. पैकी 438 लोकांना कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची आरटीपीसीआर तपासणी झाली तर लक्षणे नसलेल्या 5 हजार 811 शिक्षकांच्या रॅपिड अँटीजेन तपासण्या करण्यात आल्या

सांगली ः तब्बल आठ महिन्यांनी शिक्षणाचा श्री गणेशा उद्या (ता. 23) पासून होणार आहे. त्याआधीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या शाळा सुरु करण्याआधी शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 22 शिक्षक कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काहीशा चिंतेच्या वातावरणातच शाळांची घंटा वाजणार आहे. संपूर्ण खबरदारी घेऊन, नियम पाळून वर्ग भरवावेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात उद्या प्रत्यक्ष किती शाळा सुरु होतात, याकडे लक्ष असेल. 

जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण शाळा 16 मार्चपासून बंद आहेत. राज्य शासनाने सोमवारपासून नववी, दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरु करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. त्यासाठी सर्व शाळांनी तयारी केली आहे. बहुतांश शाळांमध्ये फवारणी करण्यात आली आहे. एक आड एक दिवस या प्रमाणे विद्यार्थी शाळेत येतील. त्यामुळे एका बाकावर एक विद्यार्थी बसेल. गणित, इंग्रजी आणि विज्ञान हे मुख्य विषयच शिकवले जातील. चार तास शाळा भरेल, त्यात जेवनाची सुटी असणार नाही. खेळ किंवा अन्य उपक्रम होणार नाहीत. विद्यार्थी गप्पा मारत थांबणे, गर्दी करणे आदी गोष्टी टाळल्या जातील. 

हे करताना आधी शिक्षकांची कोरोना तपासणी करून घ्यावी, अशा सूचना आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांनी तपासणी करून घेतली. धक्कादायक बाब म्हणजे 22 जणांना बाधा झाल्याचे समोर आले. जिल्ह्यातील 6 हजार 249 शिक्षकांच्या तपासण्या करण्यात आल्या. पैकी 438 लोकांना कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची आरटीपीसीआर तपासणी झाली तर लक्षणे नसलेल्या 5 हजार 811 शिक्षकांच्या रॅपिड अँटीजेन तपासण्या करण्यात आल्या. आता हे 22 शिक्षक ज्या शाळेतील आहेत, त्या शाळा भरवायच्या का? हाही प्रश्‍न आहे. 

एकूणच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सारे गोंधळात आहेत. त्यातच जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. दिवाळीत दररोज 20 ते 30 रुग्ण सापडत होते. आता ती संख्या शनिवारी 80 वर पोहचली. या स्थितीत पालक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष असेल. 

कोरोना बाधित कुठे, किती ? 

आटपाडी ः 3, जत ः 7, कडेगाव ः 1, कवठेमहांकाळ ः 2, मिरज ः 6, शिराळा ः 1, तासगाव ः 1, वाळवा ः 1 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona to 22 teachers in Sangli district; Shock before school starts