कोरोना रूग्णांना वाचण्यासाठी पुस्तके देण्याचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

वाळवा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी इस्लामपूर शहरात अद्यावत covid 19 care centre सुरू केले आहे.

इस्लामपूर : येथे होणाऱ्या कोव्हिड 19 सेंटरसाठी पुस्तके द्या, असे आवाहन तहसीलदार रविंद्र सबनीस यांनी केले आहे. या योजनेसाठी वाचन चळवळीनेही पुस्तके जमा करण्याचे आवाहन केले आहे. 

वाळवा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी इस्लामपूर शहरात अद्यावत covid 19 care centre सुरू केले आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार रविंद्र सबनीस यांनी या ठिकाणी रुग्णांच्या सोयीसाठी लोकसहभागातून काही बाबी करता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या काळात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढेल. त्यांना या केंद्रात दाखल करावे लागेल. त्यांना या उपचारादरम्यान आठ ते दहा दिवसांच्या काळात मनोरंजनाचे काहीही साधन उपलब्ध असणार नाही. त्यासाठी त्यांना काही पुस्तके उपलब्ध करून दिली तर त्याचा चांगला उपयोग होईल. या आजारपणाच्या काळात रुग्णांची मानसिकता काहीशी नकारात्मक असते, त्यामुळे सकारात्मक परिणाम साध्य करण्यासाठी पुस्तके मोलाची भूमिका पार पाडतील.

 त्यासाठी लोकांनी त्यांच्याकडे जी काही जुनी पुस्तके, वाचून झालेली, पुन्हा गरज नसणारी पुस्तके याशिवाय जुने काही दिवाळी अंक, पाक्षिके, मासिके असे जे जे काही वाचनीय असेल ते ते आपण जमा करावेत असे आवाहन केले आहे.

हे पण वाचा - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजूनही ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ याप्रमाणे मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत. 

 वाचन चळवळीचा पुढाकार

काही लोक स्वयंस्फूर्तीने नवी पुस्तके देण्यास इच्छुक असतील तर त्यांचे स्वागतच आहे. इस्लामपूर शहर आणि परिसरात भारताच्या सीमेवरील जवानांसाठी जी वाचन चळवळ राबवली गेली, त्या चळवळीतील कार्यकर्ते या कोव्हिड सेंटरच्या उपक्रमासाठी पुढाकार घेत आहेत. ज्यांना कुणाला पुस्तक देण्याच्या या उपक्रमात सहभागी व्हायची इच्छा आहे, त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन वाचन चळवळीचे प्रवर्तक प्रा. डॉ. संजय थोरात यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona appeals to give patients books to read