कोरोनाचा खर्च रुग्णांच्या आवाक्‍याबाहेर...खासगी रुग्णालयांचे दरपत्रक जाहीर

hospital.jpg
hospital.jpg

सांगली-  महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी सुरू करण्यात आलेल्या खासगी कोविड रुग्णालयांचे दरपत्रक प्रशासनाने आज जाहीर केले. यात नियमित तपासण्या पॅकेजमध्ये समाविष्ट आहेत. मात्र, महागड्या तपासण्या, इतर खर्च पॅकेजमध्ये नसल्याने रुग्णांना त्याचा खर्च सोसावा लागत आहे. त्यामुळे कोरोना उपचारांचा खर्च आवाक्‍याबाहेर जात आहे. या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने लेखा विभागाचे अधिकारी नियुक्त केले आहेत. 

कोविड 19 रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांचे दरपत्रक शासनाने निश्‍चित केले आहे. त्यानुसार अलगीकरण केलेल्या जनरल वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांसाठी चार हजार रुपये, अतिदक्षता विभागात अलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी सात हजार 500 रुपये आणि अतिदक्षता विभागात कृत्रिम श्‍वसन यंत्रणा लावलेल्या रुग्णांसाठी नऊ हजार रुपये असे तीन प्रकारचे प्रतिदिन दराचे पॅकेज आहेत. यात नियमित केल्या जाणाऱ्या विविध तपासण्या, इको, ईसीजी, औषधे, तपासणी, बेड, नर्सिंग चार्जेस, जेवण आदींचा समावेश आहे. 

पॅकेजमध्ये नसलेल्या बाबींमध्ये पीपीई कीट, ब्रॉंकोस्कोपी, बायोप्सी, कोविड टेस्टिंग, उच्च दर्जाची (हायएण्ड ड्रग्ज) महागडी औषधे, तसेच सीटी स्कॅन, एमआरआय, पेट स्कॅन आदी महागड्या चाचण्यांचा यात समावेश नाही. अर्थात, या चाचण्या सर्व रुग्णांसाठी नाहीत. ज्यांना आवश्‍यक आहेत, त्यांनाच त्या करण्याचा सल्ला दिला जाईल. पण, रुग्णांची प्रकृती खालावल्यास त्यांना या चाचण्या करणे क्रमप्राप्त आहे. यातील उच्च दर्जाच्या औषधांचा दर "एमआरपी'नुसार ठरविण्यात आला; तर चाचण्यांचा दर संबंधित हॉस्पिटलच्या 31 डिसेंबर 2019 च्या दरानुसार लावला जातो. 
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतील नोंदणीकृत दवाखाने वगळून खासगी रुग्णालयांसाठी हे दर आहेत. या रुग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक रुग्णालयात तीन सदस्यांची समिती नियुक्त केली. यात शासनाच्या लेखा विभागाचे अधिकारी, महापालिकेचे कर्मचारी आणि प्रशासनाचे अधिकारी यांचा समावेश आहे. 

किमान 50 हजार रुपये खर्च 
एकूणच दरपत्रक पाहता पॅकेजमधील सर्वांत कमी प्रतिदिन चार हजार रुपये खर्चानुसार दहा दिवसांचे 40 हजार रुपये, तसेच पॅकेजमध्ये नसलेल्या बाबींचा खर्च किमान दहा हजार रुपये गृहीत धरला तरी 50 हजार रुपये खर्च शक्‍य आहे. याबरोबरच जर दुसऱ्या पॅकेजचा दर लागल्यास तो दहा दिवसांसाठी 75 हजारांपर्यंत, तर अतिदक्षता आणि व्हेंटिलेटरची गरज पडल्यास हाच खर्च किमान एक लाखाच्या घरात जाऊ शकतो. त्यामुळे सामान्य रुग्णाच्या आवाक्‍याबाहेरचा हा खर्च आहे. 

हे दरपत्रक खासगी कोविड 19 रुग्णालयांसाठी आहे. ही सर्व रुग्णालये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत बसविण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे देणार आहे. त्यामुळे रुग्णांवरील खर्चाचा भार कमी होऊ शकेल. 
- नितीन कापडणीस, आयुक्त, महापालिका 


महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून या आजारावर कसा मोफत उपचार होणार, हेच कळत नाही. ही योजनाच फसवी आहे. जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी अशा योजनांना राष्ट्रपुरुषांची नावे देऊन त्यांना बदनाम करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचे, आघाडीचे नाव द्यावे. 
- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com