esakal | कोरोना मुक्तीचा जागर पोहोचला बांधावर 

बोलून बातमी शोधा

Corona Counseling helpline started working

साहेब... मॅडम... महापुराने घर पडलं, शेती गेली... आता ह्यो करोना रोग आलाय... आमच्या माणसाला तर काय होणार न्हाय नव्हं... असं म्हणून अथरून न सोडणारी, बाथरूम मधून बाहेर न पडणारी, आपल्या घरात नक्कीच काहीतरी वाईट होणार म्हणून भीती आणि काळजीने ग्रासलेली अनेक माणसं पूरपट्ट्यातील गावागावांत भेटत आहेत.

कोरोना मुक्तीचा जागर पोहोचला बांधावर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर : साहेब... मॅडम... महापुराने घर पडलं, शेती गेली... आता ह्यो करोना रोग आलाय... आमच्या माणसाला तर काय होणार न्हाय नव्हं... असं म्हणून अथरून न सोडणारी, बाथरूम मधून बाहेर न पडणारी, आपल्या घरात नक्कीच काहीतरी वाईट होणार म्हणून भीती आणि काळजीने ग्रासलेली अनेक माणसं पूरपट्ट्यातील गावागावांत भेटत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे खचलेल्या अशा व्यक्तींना मैत्रीपूर्ण आधार देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चकित्सक कार्यालय सांगली यांच्यावतीने सुरू असलेल्या मानसिक आरोग्य प्रबोधन व प्रथमोपचार कार्यक्रमांतर्गत भीती मुक्त कोरोनाचा सामना करण्यासाठी इस्लामपूर येथील शुश्रूषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेच्या मानसतज्ज्ञांचा गट लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी सक्रिय झाला आहे. ही माहिती जागर जाणिवांचा, उमेद नव्या आयुष्याची या प्रकल्पाचे प्रमुख कालिदास पाटील यांनी दिली. 

ते म्हणाले,""कोरोनाविषयी ग्रामीण भागातील लोकांच्या मनात हळूहळू भीतीची भावना वाढू लागली आहे. आता आपले कसे होईल? आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला हा आजार होईल का? आपल्याला मृत्यूची तर भीती नाही ना? असा प्रश्न चिंतेचा आजार असलेल्या लोकांमध्ये सातत्याने विचारला जातो आहे. निराशाजनक बोलणे, झोप व जेवण कमी होणे, चिडचिड वाढणे, कोणतेही शारीरिक कारण नसताना डोके दुखणे, चिंतेची तीव्रता वाढणे, आपल्याला करोनाचा आजार होईल अशा भीतीने ग्रासले जाणे आदी स्वरूपाची लक्षणे या व्यक्तींमध्ये दिसून येत आहेत. अनिवार्य कृती करण्याची सवय असणाऱ्या व्यक्तीमध्ये स्वच्छतेविषयी अतिरिक्त संवेदनाशीलता वाढली आहे.

करोनाच्या आजारात स्वच्छतेचे नियम सर्वांनाच अधिक जागरूकपणे पाळावे लागतात. अशावेळी हा आजार असणाऱ्या लोकांचा त्रास काही कालवधीकरिता वाढूही शकतो, याचा परिणाम म्हणून भीतीपोटी आत्महत्या करू नये यासाठी गरजेनुसार मानसतज्ज्ञांमार्फत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन समुपदेशन केले जात आहे. यासाठी आजवर 300 हून अधिक व्यक्तींना मानसशास्त्रीय समुपदेशन करण्यात आले आहे. चोवीस तास विशेष हेल्पलाईन सुरू आहे याचा फायदा नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुखे यांनी केले आहे. प्रकल्प समन्वयक स्वाती निलाखे, समुपदेशक क्रांती गोंधळी, तेजस्विनी साळुंखे, अभिजित वाटेगावकर, अक्षय साळुंखे, अश्विनी पाटील, ज्योती महाडिक, पूनम पाटील, रब्बाना अंबेकरी, तेजस्विनी पाटील, शुभम चव्हण, सौरभ मुळे आदी मानसतज्ज्ञ कार्यरत आहेत.. 

 हेल्पलाईन 
अधिक माहिती व प्रथमोपचारासाठी 18001024710, 9422627571 या मोफत हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा व गरजूंनी सागली येथील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील व इस्लामपूर येथील शुश्रूषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात मानस तज्ज्ञांमार्फत मोफत उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.