जिल्हा बॅंकेत कोरोनाचा शिरकाव...आतापर्यंत तिघे बाधित : निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष 

घनशाम नवाथे
Tuesday, 28 July 2020

सांगली-  सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या प्रधान कार्यालयात तसेच येथील शाखेत तीन कर्मचारी "कोरोना' पॉझिटीव्ह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. लॉकडाउन काळात बॅंकेचे संचालक घरात बसून आहेत. तर कर्मचारी शंभर टक्के उपस्थित राहून धोका पत्करून काम करीत आहेत. बॅंकेत रूग्ण आढळल्यानंतरही निर्जंतुकीकरणासह इतर उपाय योजना केल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

सांगली-  सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या प्रधान कार्यालयात तसेच येथील शाखेत तीन कर्मचारी "कोरोना' पॉझिटीव्ह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. लॉकडाउन काळात बॅंकेचे संचालक घरात बसून आहेत. तर कर्मचारी शंभर टक्के उपस्थित राहून धोका पत्करून काम करीत आहेत. बॅंकेत रूग्ण आढळल्यानंतरही निर्जंतुकीकरणासह इतर उपाय योजना केल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

"रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया' च्या आदेशानुसार सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक लॉकडाउन काळातही ग्राहकांना बॅंकिंग सेवा देत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून बॅंकेचे कामकाज नियमितपणे सुरू आहे. जिल्ह्यातील 217 शाखांमधूनही ग्राहकांना बॅंकिंग सेवा देण्यात येत आहे. लॉकडाउन काळात बॅंकेत येणाऱ्या ग्राहकांची संख्या मर्यादीत असली तरी आदेशानुसार बॅंक बंद ठेवता येत नसल्याने कामकाज सुरु आहे. लॉकडाउनच्या सुरवातीच्या काळात बॅंकेतील कर्मचाऱ्याची उपस्थिती 50 टक्केवर आणली. रोटेशन पध्दत अवलंबण्यात आली. 

लॉकडाऊनच्या सुरवातीला जिल्ह्यात रूग्ण संख्या कमी होती. सध्या शहरी आणि ग्रामीण भागातील रूग्ण वाढलेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असताना कर्मचारी 50 टक्के आणि रूग्ण वाढत असताना शंभर टक्के उपस्थिती असे उलट चित्र दिसून येते. सर्व शाखांचे काम शंभर टक्के उपस्थितीत सुरू आहे. त्यामुळे बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. तशातच बॅंकेच्या प्रधान कार्यालयातील शाखेत काम करणारा समडोळीचा एक कर्मचारी आठवडयापुर्वी कोरोना बाधीत झाला. मात्र आठवडा उलटला तरी बॅंकेची शाखा निर्जंतुकीकरण करण्यात आलेली नाही. एकीकडे ही परिस्थिती असतानाच दोन दिवसांपूर्वी आणखी दोन कर्मचारीही बाधित झाले. त्यानंतरही अधिकारी तसेच संचालक मंडळात गांभीर्य दिसून आलेले नाही. कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थितीची सक्ती केली आहे. हीच परिस्थिती ग्रामीण शाखांतही आहे. 
सध्या बॅंकेतील ग्राहकांची संख्या मर्यादीत आहे. त्यामुळे कर्मचारी उपस्थिती रोटेशन पद्धतीने ठेवावी. प्रतिबंधात्मक उपाय करून धोका टाळावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र निर्णय घेतले जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona in District Bank .So far, three have been affected: disregard for sterilization