कला महाविद्यालये बंद पडण्याचा धोका ?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

कलासंचालकांनी कोणतेच निर्णय न घेतल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे

सांगली : राज्यतील १७२ कला महाविद्यालयांतील परीक्षा, निकाल, प्रवेशप्रक्रिया, सत्रारंभ आणि ऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यार्थी-पालकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. कलासंचालकांनी कोणतेच निर्णय न घेतल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. 

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील इतर शाळा व महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेसह ऑनलाइन शिक्षण प्रणाली जूनपासून सुरू झाली. मात्र, कला संचालनालयाच्या अखात्यारित असलेल्या सुमारे दहा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकसुद्धा जाहीर झालेले नाही. या विविध पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या कला महाविद्यालय स्तरावर गोंधळाची स्थिती आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रतेसाठी दहावी व बारावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर होऊन बरेच दिवस झालेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयांतर्गत कला संचालनालय हे आहे.

हेही वाचा - सांगली बाजार समितीत दिवसभरात 50 कोटीची उलाढाल ठप्प...

विद्यमान कला संचालक राजीव मिश्रा कलेच्या क्षेत्रातील नाहीत. काही वर्षापूर्वी शासनाने प्रभारी कलासंचालक म्हणून त्यांची नेमणूक केली. शिवाय ते पूर्णवेळ नसल्यामुळे कला संचालनालयाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. 
महाराष्ट्र राज्य चित्रकला महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर संघ (महाकॅटना), द फेडरेशन ऑफ आर्ट इन्स्टिटयुशन आणि महाराष्ट्र राज्य कला महाविद्यालयीन संघ यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे लेखी तक्रार केली. तरीही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

काही दिवस ही स्थिती अशीच राहिली तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे नाईलाजाने अन्य अभ्यासक्रमांकडे वळतील. परिणामी बहुतांशी कला महाविद्यालये बंद पडण्याचा धोका आहे. अशी भिती शिक्षक व्यक्त करीत आहेत. ग्रामीण भागातील व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असंख्य विद्यार्थी कलाक्षेत्रात करिअरसाठी पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. परंतू कलासंचालनालयाच्या अनागोंदी कारभारामुळे हे नांव सध्या दिवसेंदिवस मागे पडत आहे. 

हेही वाचा - शेतात उत्पत्ती झालेला सांगलीचा हा गणपती कोणता ? 

असे आहेत अभ्यासक्रम... 

फाईन आर्ट, उपयोजित कला, शिल्पकला, टेक्‍सटाईल डिझाईन, इंटिरिअर डिझाईन, आर्ट टीचर्स डिप्लोमा.

"पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक तत्काळ जाहीर करावे, अन्यथा राज्यातील कला महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, शिक्षक तीव्र आंदोलन करतील." 

- बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष, महाकॅटना.

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona effect on art colleges future of this colleges dangerous ignore by government