सहकार क्षेत्राला कोरोनाचा फटका; नफा विभागणीला खो

शामराव गावडे
Monday, 5 October 2020

आर्थिक वर्षाप्रमाणे ३१ मार्चला या संस्थांचे आर्थिक वर्ष संपते. नंतर लेखापरीक्षण व ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये या संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होतात.

नवेखेड :  कोरोनाच्या महामारीचा फटका सर्व क्षेत्राला बसत आहे. सहकार क्षेत्राला त्याचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील तीन हजाराहून अधिक सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्या नसल्याने नफा विभागणीला खो  बसला आहे.
 

सांगली जिल्हा सहकाराचं उगमस्थान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. येथे सहकार निर्माण झाला, त्याचबरोबर तो वाढला व फोफावला देखील. जिल्ह्याच्या अर्थकारणाचा सहकार केंद्रबिंदू. लोकांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या सहकारी संस्था यामध्ये शंभरी पूर्ण केलेल्या अनेक विकास सेवा संस्थाचादेखील समावेश आहे. 

आर्थिक वर्षाप्रमाणे ३१ मार्चला या संस्थांचे आर्थिक वर्ष संपते. नंतर लेखापरीक्षण व ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये या संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होतात. अनेक सहकारी संस्थांच्या सभा वादळी होतात, गाजततात. यामध्ये सभासदांच्या कळीचा मुद्दा म्हणजे नफा विभागणी हा असतो. संस्थेला झालेल्या नफ्याची विविध प्रकारच्या तरतुदी करून नफा वाटणी केली जाते. या नफा वाटनीला कायद्याप्रमाणे सर्व साधारण सभेची मंजुरी आवश्यक असते. प्रत्येक सभासदाच्या शेअर्स प्रमाणे  पाच टक्के पासून ते १२ ते १५ / टक्‍क्‍यांपर्यंत शेअर्स नुसार  सभासदांना त्याचे वाटप केले जाते. साधारणपणे दसरा दिवाळी या सणाचे औचित्य साधून या लाभांश चे वाटप होते. सणासुदीच्या काळात अनेकांना हा लाभांश आधार ठरतो. परंतु कायद्याच्या कचाट्यात सहकार क्षेत्र अडकल्याने वार्षिक सभा झालेले नाहीत. कोरोना महामारीमुळे लोकांना एकत्र करु नये असे आदेश असल्याने हे सर्व ठप्प आहे. यावर मार्ग निघून लाभांश वाटप व्हावे अशी मागणी सहकारी संस्थांच्या सभासदांमधून  होत आहे

जिल्ह्यातील सहकारी संस्था
 मध्यवर्ती बँक  १
विकास सोसायट्या ७६७
प्राथमिक बिगर शेती पतपुरवठा संस्था ११३१
पणन संस्था  ४५
प्रक्रिया उत्पादक (साखर कारखाने व इतर) ४२१
दूध संस्था  ५७२

कोरोणाच्या महामारीमुळे सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा घेऊ  नये असे आदेश आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभांना परवानगी नाही. यावर सध्या तरी पर्याय नाही.
-निळकंठ करे, जिल्हा निबंधक सहकारी संस्था सांगली

सदस्यांच्या मासिक सभेत नफा विभागणीला परवानगी द्यावी. त्याचे निकष मात्र सहकार खात्याने तयार करून पाठवावे. 
-जयकर चव्हाण, अध्यक्ष नवेखेड सर्व सेवा सोसायटी 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona effect on cooperative sector