कोरोना इफेक्‍ट...सांगलीकरांचा बाप्पांना घरच्या घरी निरोप 

बलराज पवार
Saturday, 29 August 2020

महापालिका क्षेत्रात यंदा गणेशोत्सवावर कोरोना इफेक्‍ट चांगलाच जाणवत आहे. वाढत्या कोरोनामुळे गर्दी, संपर्क टाळण्यासाठी सांगलीकरांनी घरीच गणपती विसर्जनासही प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.

सांगली : महापालिका क्षेत्रात यंदा गणेशोत्सवावर कोरोना इफेक्‍ट चांगलाच जाणवत आहे. वाढत्या कोरोनामुळे गर्दी, संपर्क टाळण्यासाठी सांगलीकरांनी घरीच गणपती विसर्जनासही प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. तर निर्माल्यही घरीच खतासाठी वापरण्याची मानसिकता दिसून आली. 

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोरोनाच्या काळात आलेल्या गणेशोत्सवात गर्दी कमी करुन नागरिकांचा संपर्क कमी होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक मंडळांना बंधने घातली. शक्‍यतो नागरिकांनी घरीच गणपती विसर्जन करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच विविध भागात कृत्रिम तलाव आणि विसर्जन कुंडाची तसेच निर्माल्य कुंडाची सोय करून दिली. यामुळे यंदा विसर्जनासाठी नदीवर येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. नदीपात्रात विसर्जन होणाऱ्या गणेश मूर्तींची संख्याही कमी झाली. त्यामुळे नदी प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. 

आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सहाव्या दिवसाअखेर 351 गणेश मुर्ती दान म्हणून आल्या असून 10 हजार 47 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले आहे. निर्माल्य कलशात सहाव्या दिवसाअखेर 52 टन निर्माल्य जमा झाले आहे. नदी पात्रात 8 हजार 883 तर कृत्रिम तलाव आणि विसर्जन कुंडामध्ये एक हजार 164 गणेश मूर्ती विसर्जन झाले. 

घरीच मुर्ती बनवण्याचाही आनंद 
यंदा कोरोनामुळे घरीच गणपती मुर्ती बनवून उत्सव झाल्यानंतर घरीच विसर्जन करणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने युवा वर्गाने माती, शाडूपासून घरीच मुर्ती बनवण्याचा आनंद घेतला. मूर्ती विसर्जनही घरीच करण्याकडे कल वाढला आहे. तर निर्माल्यही घरच्या बागेत छोटा खड्डा खणून त्यात विसर्जित केले. त्यामुळे यंदा घरच्या घरीच गणेशोत्सव साजरा झाला आहे. 

यंदा खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा झाला. घरी मुर्ती बनवणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली तशी घरीच विसर्जन करण्याचे प्रमाणही चांगलेच वाढले. सुमारे दोन ते तीन हजार नागरिकांनी घरीच मुर्ती विसर्जन केले. त्यामुळे नदीवर गर्दीही कमी होती. डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुपतर्फे गेली 20 वर्षे आम्ही याच प्रकारच्या गणेशोत्सवासाठी जनजागृती करत आहोत. 
- प्रा. शशिकांत ऐनापुरे, संस्थापक, डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect ... Farewell to Sangli Bappa at home