द्राक्ष हंगामावर यंदाही "कोरोना इफेक्‍ट' 

रवींद्र माने
Monday, 22 February 2021

द्राक्ष शेती आणि उत्पादक शेतकऱ्यांमागे लागलेले शुक्‍लकाष्ठ यावर्षी संपायचे नाव घेत नाही. हंगाम ऐन भरात असताना द्राक्षदर पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

तासगाव (जि. सांगली) : द्राक्ष शेती आणि उत्पादक शेतकऱ्यांमागे लागलेले शुक्‍लकाष्ठ यावर्षी संपायचे नाव घेत नाही. हंगाम ऐन भरात असताना द्राक्षदर पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कोरोनाचे सावट, दिल्लीतील आंदोलन आणि बदलते वातावरण यामुळे अडचणी वाढू लागल्या आहेत. पेटीमागे 100 ते 150 रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

जिल्ह्यातील सुमारे 32 हजार हेक्‍टर क्षेत्र द्राक्षवेलींखाली आहे. ग्रामीण भागात गावोगावी दलाल बागा शोधताना आणि द्राक्ष बागायतदार दलालांना शोधताना दिसत आहेत. यावर्षीचा द्राक्ष हंगामाची शेतकऱ्यांना दिलासा देणारी परिस्थिती नाही. मुळात छाटणीपासून यावर्षी शेतकरी अनंत अडचणीना तोंड देत आहे.

पावसामुळे छाटण्या लांबल्या. त्यानंतर अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस, गारपीट आणि आता ऐन पीक काढणीला आले असताना अचानक बदललेले वातावरण हे शुक्‍लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. गेल्या वर्षीपासून कोरोनाचे सावट कायम आहे. त्यात आणखी दिल्लीमधील आंदोलनामुळे उत्तर भारतातील बाजरपेठ विस्कळित झाली आहे. पेटीमागे 100 ते 120 रुपयांचा फटका सध्या शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक कारणे सांगून द्राक्ष व्यापारीही दर पाडताना दिसत आहेत. आजअखेर 50 टक्के बागा शिल्लक आहेत. एकाचवेळी झालेल्या छाटण्यांमुळे बागाही एकाचवेळी तयार होत आहेत. 

निर्यातीवर परिणाम 
जगात अनेक देशांमध्ये कोरोनाचे सावट असल्याने द्राक्ष निर्यात कमी आणि दरही कोसळले आहेत. युरोपमध्ये अनेक देशांत अजून लॉकडाऊन आहे. चीनमध्ये मोठ्याप्रमाणात निर्यात होत होती. मात्र यावर्षी चिलीच्या द्राक्षांनी तेथे शिरकाव केल्याने निर्यात थांबली आहे. रशियामध्ये अद्याप निर्यात सुरू नाही. आखाती देशामध्ये निर्यात होत असली तरी दर कमी आहेत. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षेही मातीमोल दराने द्यावी लागत आहेत. यावर्षी निर्यात करणाऱ्या कंटेनरचे भाडे 250 वरून 400 डॉलर झाले आहे. शिवाय एका कंटेनरमागे 1 लाख 50 हजार अर्थसहाय्य केंद्र सरकारने बंद केले आहे. हा खर्च वाढल्याने त्याचा फटका मिळणाऱ्या पैशात शेतकऱ्यांना बसणार आहे. 

चीन आणि रशियाची निर्यात बंद आहे
भारतीय बाजारपेठ आणि युरोपमध्येही द्राक्षाला म्हणावी तशी मागणी नाही, यावर्षी चीन आणि रशियाची निर्यात बंद आहे. परिणामी द्राक्षाला योग्य दर नसल्याची प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली. 
- राजेंद्र हिंगमिरे, संचालक, द्राक्ष बागायतदार संघ 

वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम
वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम यावर्षी द्राक्ष हंगामावर झाला आहे. दिल्ली बाजारपेठेत दररोज 100 ते 150 गाड्या जात. त्या सध्या बंद असल्याचा मोठा परिणामही जाणवतो आहे. त्यामुळे यंदा व्यापारीही कमी आले आहेत. 
- बबनराव जमदाडे, मणेराजुरी, शेतकरी 

द्राक्षाचे सध्याचे दर

 • सुपर सोनाका - 200 ते 250 
 • सोनाका - 150 ते 200 
 • माणिक चमन - 125 ते 150 

निर्यातक्षम द्राक्षाचे सध्याचे दर 

 • युरोप - 65 ते 70 (थॉमसन) 
 • दुबई - 45 ते 50 (सोनाका) 
 • अन्य देश- 65 ते 60 (सोनाका) 

जिल्ह्यातील द्राक्ष क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 

 • तासगाव 9250 
 • मिरज - 8268 
 • जत - 6906 
 • कवठेमहांकाळ -2806 
 • पलूस - 1561 
 • खानापूर -1125 
 • आटपाडी - 365 
 • कडेगाव - 229 

संपादन :  युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Corona effect" on grape season again in Sangali District