"कोरोना' चा फटका : सात हजार रिक्षा चालकांवर ऊसनवारीची वेळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

सांगली- "कोरोना' मुळे "लॉक डाऊन' आणि संचारबंदीच्या परिस्थितीमुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, उद्योग ठप्प आहेत. मीटर "डाऊन' केले तरच संसाराचा गाडा चालणारे रिक्षा चालक यातून वाचले नाहीत. रिक्षाचे मीटर सध्या बंद असल्यामुळे कर्जबाजारी आणि ऊसनवारी होऊन त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. जिल्ह्यातील 7 हजार रिक्षा चालकांची जवळपास हीच परिस्थिती आहे. त्यांना रिक्षाच्या मीटर "डाऊन' ची प्रतिक्षा आहे. 

राज्यात "कोरोना' चे रूग्ण आढळण्यास सुरवात झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात आला. 14 मार्चपासून एसटी बसेसच्या फेऱ्या कमी करण्यास प्रारंभ झाला. तर रिक्षा चालकांना देखील प्रवासी वाहतूक करण्यास मनाई केली. 22 पासून एसटीची सेवा पूर्णपणे बंद केली. त्याचबरोबर वडाप आणि रिक्षा वाहतूक देखील पूर्णपणे बंद झाली. 

"लॉक डाऊन' मुळे रिक्षा चालकांना व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. रिक्षा व्यवसाय म्हणजे दिवसभर काम केल्यानंतरच घरात चूल पेटते असे चित्र आहे. तसेच भाड्याने रिक्षा चालवणाऱ्यांची अवस्था तर त्याहून अधिकच वाईट आहे. स्वत:चे घर असलेले रिक्षा चालक फारच कमी आहेत. बहुतांश रिक्षा चालक भाड्याने खोली घेऊन राहतात. नविन रिक्षा असेल तर कर्जाचे हप्ते, विमा हप्ते, आरटीओ परवाना नूतनीकरण, पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती, सुट्या भागांच्या वाढत्या किंमती, देखभाल-दुरूस्ती यामुळे हा व्यवसाय फारच अडचणीत आहे. 

"कोरोना' मुळे रिक्षा फिरायची बंद झाल्यानंतर पोटाची खळगी भरण्याचा प्रश्‍न रिक्षा चालकांसमोर उभा राहिला आहे. अनेकांनी उदरनिर्वाहासाठी दहा हजार रूपयापर्यंत कर्जे काढून किराणा माल भरला आहे. भाजीपाला परवडत नसल्यामुळे भाकरी आणि आमटी-भात खाऊन जगण्याची वेळ आली आहे. उधारीवर किराणा माल मिळत नसल्यामुळे रोखीने जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करायच्या तरी कशा? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. दैनंदिन खर्च, घरभाडे, दवाखान्यातील औषधोपचार यासाठी उसनवारी आणि कर्जाने घेतलेले पैसे संपत आले आहेत. त्यामुळे "कोरोना' चे संकट दूर होऊन कधी एकदा रिक्षा रस्त्यावरून "मीटर डाऊन' होते? याची प्रतिक्षा लागली आहे. 
 
""जिल्ह्यात जवळपास 7 हजारहून अधिक रिक्षा चालक आहेत. त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. कर्जबाजारी होऊन तसेच उसनवारी करून उदरनिर्वाह करावा लागत आहे. मजूरांप्रमाणेच रिक्षा चालकांची परिस्थिती आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आणि "लॉक डाऊन' नंतर त्यांना मदतीची गरज आहे.'' 
-प्रमोद होवाळे (रिक्षा चालक) 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Corona' effect : time to loan over 7 thousand rickshaw drivers