
मिरज सिव्हिल... या घडीचं कोरोना हॉस्पिटल... येथे 25 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत... इथे जायचं म्हटलं तर आता अंगावर काटा येतो... तिथून कुणी आलाय म्हटलं, तरी लोक दहा फूट लांब सरकतात...मग इथं काम करणारे डॉक्टर, नर्स, बंदोबस्तावरील पोलिस त्यांचे काय ? त्यांना नसेल भिती? त्यांच्या कुटुंबियांना वाटत नसेल धास्ती...त्यांनाही भिती आहे. पण "ड्युटी फस्ट'... ही केवळ नोकरी नाही तर व्रत आहे. अशा व्रतस्थ लोकांना भेटायला मी कोरोना हॉस्टिपलमध्ये गेलो. अर्थात संपूर्ण दक्षता घेऊनच. या घडीला तिथं राबणाऱ्यांची नावं प्रसिद्ध करता येणार नाहीत. मात्र त्यांच्या भावनांचा कल्लोळ शब्दांच्या पलीकडचा आहे.
""मी आत जाऊ शकतो का?'' कोरोना हॉस्पिटलच्या प्रवेशव्दारात तळ ठोकून 24 तास पहारा देणाऱ्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याला माझं ओळखपत्र दाखवत मी विचारलं. त्या म्हणाल्या,""अगदीच गरजेचं असेल तर जा.''
डॉक्टरांना भेटून काही माहिती घ्यायची आहे, असे सांगितल्यावर त्यांनी परवानगी दिली. या प्रवेशव्दारातून लोक आत जायला धजत नाहीत. किती जवळचा पाहुणा असला तरी आता बघायलाही कुणी फिरकत नाही. वैद्यकीय आणि सुरक्षा क्षेत्रातील लोक आणि अगदीच गंभीर आजारी व्यक्ती वगळता इतरांना प्रवेश बंद आहे. सगळीकडे एक सन्नाटा आहे. प्रचंड गजबज असलेले हॉस्पिटल निपचीत आहे. काही मोजकी वाहणे, रुग्णवाहिका, सुरक्षा बलचे जवान एवढ्यांचीच वर्दळ. मी त्यातील "सुरक्षा बल'च्या कर्मचाऱ्याला भेटलो.
""मित्रा, तुझी नेमणूक कोरोना हॉस्पिटलमध्ये आहे, हे तुझ्या कुटुंबियांना माहिती आहे का?'' या प्रश्नावर तो हसला. ""आईला माहिती नाही, बाकीच्यांना माहिती आहे. काळजी घेण्याबाबत सतत सूचना सुरु आहेत'', त्याने हसत उत्तर दिले. आईला कळले तर ती काही इथं थांबू द्यायची नाही, असाच त्याचा म्हणण्याचा रोख होता. या घडीला काम करणाऱ्या प्रत्येकाच्या आईची आणि कुटुंबियांची हीच भावना आहे.
""मला काही फोटो घ्यायचे आहेत, घेऊ का?'' मी परवानगी मागितली. त्याने आधी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्या, असे सुचवले. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात नेले. त्याआधी सॅनिटायझरने हात स्वच्छ करून घेतले. परवानगीच्या निमित्ताने मुख्य व्यक्तींपर्यंत थेट प्रवेश मिळाला. तेथेही सॅनिटायझर पुढे केले. हा कक्ष खूप वेगळा भासला. हे सारे डॉक्टर कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या टीमचा एक हिस्सा आहेत. जगभर थैमान घातलेल्या विषाणूशी ते दोन हात करीत आहेत. बाहेर प्रचंड धास्ती, भिती आहे, इथे मात्र त्या तणावावर हलक्या-फुलक्या संवाद, गप्पांतून मात करण्याचा प्रयत्न सुरु होता. सोबत खूपसारे काम समोर पडले होते. एक महिला कर्मचारी गर्भवती असल्याने रजेबाबत चौकशी करीत होती. तिलाही रजा देण्यास असमर्थता दर्शवत पर्यायी नेमणुकीचा मार्ग काढला गेला. एकदा का व्रत स्विकारले, की त्यासाठी झोकून द्यावे लागते. ती कुणीसाठी अगतिकता असेलही, मात्र व्रतस्थ रहा, असा अबोल संदेश यानिमित्ताने ही यंत्रणा देत होती.
डॉक्टरांना माझा पहिला प्रश्न,""तो इस्लामपूरचा दोन वर्षाचा चिमुरडा कसा आहे?'' ते म्हणाले,""उत्तम आहे. त्याची सारेच विशेष काळजी घेत आहेत. तो एकटाच नाही तर सर्व 25 रुग्णांची प्रकृती चांगली आहे.''
इस्लामपुरातील एकाच कुटुंबातील 25 जण पलीकडच्या इमारतीत उपचार घेत आहेत. त्यात एक चिमुरडा आहे. त्याची आई त्याला दर दोन तासांनी भेटते. या साऱ्यांसाठी पुढचा एक आठवडा खूप महत्वाचा असणार आहे.
डॉक्टरांना विचारले,""तुमच्या घरी काय स्थिती आहे?'' सारे खळखळून हसले. इतक्या प्रचंड तणावातही हे हसू त्यांच्या कष्टाची साक्ष देणारे होते. ते म्हणाले,""आम्ही घरात पाऊल ठेवायच्या आधी कपडे काढतो. आम्हीच स्वच्छ धुतो. आंघोळ करतो. सॅनिटायझर लावतो आणि मग घरात प्रवेश मिळतो. हे केलं पाहिजे, प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, आम्ही थोडी जास्तच घेतली पाहिजे.''
दुसरे डॉक्टर म्हणाल्या,""माझी बायको पण डॉक्टर आहे. त्यामुळे अति काळजी काय असते, याचा मी अनुभव घेतोय.'' एका ज्येष्ठ डॉक्टरांनी ""मला स्वप्नातही कोरोना दिसायला लागलाय'', असे सांगून या विषयात त्यांनी किती झोकून दिलेय, याची प्रचिती दिली. "कोरोना हॉस्पिटल' असा नवा उल्लेख होत असलेल्या मिरज सिव्हिलच्या अंतरंगात ही मंडळी करत असलेली धडपड या संकटकाळात धीर देणारी आहे. त्या साऱ्यांनी माझ्या माध्यमातून साऱ्यांना हात जोडले, कळकळीची विनंती केली...आम्ही तुमच्यासाठी रुग्णालयात आहोते, तुम्ही आपणा सर्वांसाठी घरातच रहा..!
खाकी वर्दीतल्या आईची काळजी
कोरोना हॉस्पिटलच्या प्रवेशव्दारावर महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती आहे. त्यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या,""इथे नेमणूक आहे, याची घरात माहिती आहे आणि साऱ्यांनी ते स्विकारले पाहिजे. कारण, वर्दी म्हणजे जबाबदारी. ती झटकून चालणार नाही. आम्ही पूर्ण काळजी घेतोय. कारण, आमचीही मुले आहेत. त्यांच्यासाठी आम्ही स्वतःला जपलं पाहिजे. लोकांनीही आपल्या मुलांसाठी घरात थांबावं.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.