हुतात्मा साखर कारखान्यावर कोरोना किलर यंत्रणा

धर्मवीर पाटील
Friday, 23 October 2020

जागतिक पातळीवर विशेष महत्व प्राप्त झालेल्या आयोनायझेशन या शास्त्रशुद्ध पद्धतीवर संशोधित कोरोना किलर ही यंत्रणा येथील हुतात्मा साखर कारखान्यावर कार्यान्वीत करण्यात आली आहे.

वाळवा (जि. सांगली ) ः जागतिक पातळीवर विशेष महत्व प्राप्त झालेल्या आयोनायझेशन या शास्त्रशुद्ध पद्धतीवर संशोधित कोरोना किलर ही यंत्रणा येथील हुतात्मा साखर कारखान्यावर कार्यान्वीत करण्यात आली आहे. या यंत्रणेचे उद्‌घाटन हुतात्मा उद्योग समुहाचे नेते वैभव नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले. 

या मशीनचे संशोधन केलेल्या इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स या कंपनीचे संस्थापक, इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर भाऊसाहेब जंजिरे व सहकाऱ्यांनी कोरोना किलर या मशीनचे सादरीकरण केले. कोरोना व्हायरसला ही मशीन कशा पद्धतीने निष्प्रभ करते याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती दिली.जंजिरे यांच्या समवेत प्रख्यात कायदे तज्ञ व लिमका बुक पारितोषिक विजेते, गिनीज बुकने ज्यांच्या कामाची दखल घेतलेले ऍड्‌. विकास बा.पाटील शिरगांवकर, संजय पवार (नाना) हे उपस्थित होते. यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय, शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. 

भाऊसाहेब जंजिरे म्हणाले,"" कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण मास्क लावणे, आसपासच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे हे उपाय करतो. मात्र अनेक वस्तूंचे निर्जंतुकीकरण मात्र करू शकत नाही. नेमक्‍या याच अडचणीवर मात करुन आपले घर किंवा कामाचे ठिकाण कोरोना व्हायरसमुक्त करण्याची क्षमता असलेले तंत्र व मशीन संशोधित केले आहे. आय. सी. एम.आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) एन. आय. व्ही. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) तसेच महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने या मशीनची कार्यक्षमता प्रमाणित केली आहे.

निवासस्थानापासून ते सर्व व्यवसायाच्या ठिकाणी हे मशीन बसविता येते. ज्या ठिकाणी हे मशीन बसविण्यात येते तेथील थोडी हवा ही मशीन घेते आणि त्या हवेचे आयोनायझेशन करून पुन्हा त्या भागातील संपूर्ण हवेत सोडते. ज्या ज्या ठिकाणी ही हवा पोहोचते तेथे हे आयान पोहचतात व कोरोना व्हायरस आणि इतर विषाणू तसेच अपायकारक सूक्ष्मजीव नष्ट व निष्प्रभ होतात.'' 

समूहात सर्वत्र ही यंत्रणा बसणार

कोरोना अद्याप गेलेला नाही. सर्वानीच आपली काळजी घेणे गरजेचे आहे. अशा वेळी कोरोना किलर सारखी हाताळण्यास सोपी आणि प्रभावी उपकरणे संशोधित केली आहेत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आपल्या कर्मचारी आणि सहकाऱ्यांना सुरक्षितपणे काम करता येणे यासाठी आम्ही प्राधान्य दिले आहे. आमच्या सहकार समूहात सर्वत्र ही यंत्रणा बसवली जाणार आहे.
- वैभव नायकवडी

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona killer mechanism at Hutatma Sugar Factory