जिल्हा बॅंकेतील कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू 

घनशाम नवाथे
Tuesday, 4 August 2020

सांगली- येथील कर्मवीर चौकातील जिल्हा बॅंकेत अकाऊंटंट म्हणून कार्यरत असलेल्या 50 वर्षीय व्यक्तीचा आज सकाळी "कोरोना' मुळे मृत्यू झाला. त्यामुळे बॅंकिंग क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. 

सांगली- येथील कर्मवीर चौकातील जिल्हा बॅंकेत अकाऊंटंट म्हणून कार्यरत असलेल्या 50 वर्षीय व्यक्तीचा आज सकाळी "कोरोना' मुळे मृत्यू झाला. त्यामुळे बॅंकिंग क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. 

जिल्हा बॅंकेच्या मध्यवर्ती इमारतीमध्येच बॅंकेची मिरज रस्ता शाखा कार्यरत आहे. बॅंकेत कार्यरत असलेला समडोळी (ता. मिरज) येथील कर्मचारी आठवड्यापूर्वी "पॉझिटीव्ह' आढळला होता. त्यानंतर आणखी तीन कर्मचारी बाधित असल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली होती. या चार रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी गव्हर्मेंट कॉलनीतील हसनी आश्रमजवळ राहणाऱ्या 50 वर्षीय अकाऊंटंटचा आज दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूची बातमी समजताच बॅंकेत खळबळ उडाली. 

दरम्यान जिल्हा बॅंकेत कोरोना बाधित रूग्ण आढळल्यानंतर यापूर्वीच बॅंकेची इमारत निर्जंतुकीकरण करण्यात आली आहे. तसेच बॅंकेच्या प्रत्येक शाखेत 50 टक्केच कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यात आली आहे. रोटेशन पद्धतीने कर्मचारी उपस्थित राहत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा बॅंक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. बॅंक कामकाजाची वेळ सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत ठेवली आहे. बॅंकेतील कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड मास्क देण्यात आले आहेत. तसेच सॅनिटायझर मशिन देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona kills District Bank employee