कोरोनामुक्‍तीचा संकल्प ! 'या' महापालिकेच्या नगरसेवकांनी जनजागृती अन्‌ ऍन्टीजेन टेस्टवर दिला भर 

तात्या लांडगे
Friday, 24 July 2020

नागरिकांच्या मनातील भिती दूर करण्याला प्राधान्य 
प्रभाग क्रमांक 16 मधील मौलाली चौक, गांधी नगर, लष्कर, आंबेडकर नगरात ऍन्टीजेन टेस्ट केली आहे. नागरिकांच्या मनात भिती असून गैरसमज दूर करुन त्यांची टेस्ट केली जात आहे. त्यासाठी नगरसेवक संतोष भोसले, नागेश कोळी, नगरसेविका मीनाक्षी कंपल्ली यांच्यासह कार्यकर्तेही मदत करीत आहेत. 
- फिरदोस पटेल, नगरसेविका

सोलापूर : शहरातील प्रभाग क्रमांक 11, 20 आणि 22 हे तीन प्रभाग वगळता अन्य प्रभागांमधील रुग्णसंख्या 100 पेक्षा अधिक झाली आहे. तर तीन, पाच आणि 24 या प्रभागांमध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या जोडीला आता नगरसेवकांनीही पुढाकार घेतला आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसह गंभीर आजार असलेल्यांची टेस्ट व्हावी, त्यांचे वेळेत निदान व्हावे म्हणून घरोघरी सर्व्हे सुरु केला आहे.

 

शहरात 16 ते 26 जुलै या काळात पुन्हा कडक संचारबंदी लागू केली. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून झोपडट्टीतील संसर्ग आता अपार्टमेंट अन्‌ बंग्लोज्‌मध्ये पोहचला आहे. दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही कमी झाले नाही. या पार्श्‍वभूमीवर रुग्णांचे लवकर निदान व्हावे, त्यांच्यावर वेळेत उपचार करता यावेत, या हेतूने रॅपिड ऍन्टीजेन टेस्टवर भर दिला जात आहे. महापौर श्रीकांचना यन्नम, माजी उपमहापौर शशिकला बत्तुल, नगरसेवक डॉ. किरण देशमुख, अमित पाटील, माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनीही प्रभागांमध्ये आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यावर भर दिला आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी महापालिका अन्‌ पोलिस प्रशासनासोबत स्थानिक नगरसेवकांनीही पुढाकार घेतला. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचा संसर्ग कमी होईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे. 

ऍन्टीजेन टेस्ट करण्याचे नागरिकांना आवाहन 
विडी घरकुल परिसरात घरोघरी सर्व्हे सुरु केला आहे. दररोज शंभर व्यक्‍तींची टेस्ट करण्याचे उद्दिष्टे केली जात आहे. प्रभाग दहा व अकरामध्ये आतापर्यंत सहाशे व्यक्‍तींची कोरोना टेस्ट पूर्ण झाली आहे. नगरसेवक महेश कोठे यांनीही त्यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. 
- प्रथमेश कोठे, नगरसेवक 

प्रभाग पाचमधील तीन नगर कोरोनामुक्‍त 
प्रभाग पाचमध्ये ऍन्टीजेन टेस्टवर भर दिला आहे. जनजागृती करणे, ऍन्टीजेन टेस्टचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मिलिंद नगर, जय मल्हार चौक आणि अण्णाभाऊ साठे चौक परिसरात मागील 25 दिवसांत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. गणेश पुजारी, ज्योती बमगोंडे यांनीही त्यासाठी परिश्रम घेतले. 
- आनंद चंदनशिवे, नगरसेवक 

 

प्रभाग कोरोनामुक्‍त करण्यासाठी ऍन्टीजेन टेस्टवर भर 
आपला प्रभाग स्वच्छ, निरोगी राहावा, यासाठी नागरिकांच्या मदतीने प्रभाग कोरोनामुक्‍त करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. घरोघरी जाऊन नागरिकांना ऍन्टीजेन टेस्ट करण्यासाठी आवाहन केले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांसह अन्य नगरसेवकांच्या मदतीने निश्‍चितपणे प्रभाग कोरोनामुक्‍त होईल. 
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक 

 

झोन समितीच्या बैठका अन्‌ जनजागृतीवर जोर 
महापालिकेच्या वतीने ऍन्टीजेन टेस्ट केल्या जात आहेत. प्रभाग क्रमांक सहामधील बहुतांश नागरिकांनी ही टेस्ट करुन घ्यावी, यासाठी घरोघरी जनजागृती केली जात आहे. प्रभाग समितीचे अध्यक्ष म्हणून झोनमध्ये बैठकाही घेतल्या जात आहेत. ज्योती खटके यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 
- गणेश वानकर, नगरसेवक 

नागरिकांच्या मनातील भिती दूर करण्याला प्राधान्य 
प्रभाग क्रमांक 16 मधील मौलाली चौक, गांधी नगर, लष्कर, आंबेडकर नगरात ऍन्टीजेन टेस्ट केली आहे. नागरिकांच्या मनात भिती असून गैरसमज दूर करुन त्यांची टेस्ट केली जात आहे. त्यासाठी नगरसेवक संतोष भोसले, नागेश कोळी, नगरसेविका मीनाक्षी कंपल्ली यांच्यासह कार्यकर्तेही मदत करीत आहेत. 
- फिरदोस पटेल, नगरसेविका 

 

प्रभागातील बहुतांश नागरिकांची ऍन्टीजेन टेस्ट करण्याचा प्रयत्न 
प्रभाग क्रमांक नऊमधील सर्वच नागरिकांची ऍन्टीजेन टेस्ट करण्यावर भर दिला जात आहे. भवानी पेठ, रविवार पेठ यासह अन्य भागातील नागरिकांची टेस्ट केली आहे. नगरसेवक अविनाश बोमड्याल, नगरसेविका रामेश्‍वरी बिर्रु, राधिका पोसा यांनीही पुढाकार घेतला आहे. 
- नागेश वल्याळ, नगरसेवक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona liberation resolution solapur Municipal corporators emphasized on public awareness and antigen test