esakal | जिंदगीचा झालाय 'खेळ'; चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

बोलून बातमी शोधा

null

जिंदगीचा झालाय 'खेळ'; चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : साधारणपणे १५ ते २० वर्षांचा 'फ्लॅशबॅक' बघितला तर सुपरहिट चित्रपटांचाच काळ होता. चित्रपटगृहाबाहेर प्रत्येक खेळाला सायकल स्टॅन्डला शेकडो सायकलींची माळ दिसायची. चित्रपटगृह मालक, १० ते १५ कर्मचारी, सायकल स्टॅन्ड मालक, पानटपरी चालक, मध्यंतराला खाद्य पुरवणारी मंडळी यांची आर्थिक उलाढाल वाढली होती; परंतु गेल्या काही वर्षात हे चित्र बदलले. एकेरी पडदा असलेल्या चित्रपटगृहांसमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे जिल्ह्यातील ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या जिंदगीचाच ‘खेळ’ होऊन बसला.

साधारणपणे १५ वर्षांपूर्वीचा काळ बघितला तर चित्रपटांना गर्दी खेचणारा असा काळ होता. तिकिटाच्या रांगेत धक्काबुक्‍की केल्याशिवाय तिकीट मिळत नव्हते. पहिल्या खेळाला तिकीट मिळाले नाहीतर काहीजण तिकिट घराबाहेर झोपूनच दुसऱ्या खेळाची तिकीट विक्री सुरू होईपर्यंत प्रतीक्षा करत होते. तिकिटासाठी भलीमोठी रांग दिसायची. तिकीट मिळाले की तत्काळ सायकल स्टॅन्डवर लावली जायची. दुचाकीसाठी फारसी अडचण यायची नाही; परंतु हाऊसफुल्ल चित्रपट असेल तर आवारात स्टॅन्डवर शेकडो सायकलींची माळ दिसून येत होती.

हेही वाचा: नाशिक, विरारमधील घटनेनंतर सांगली-मिरज रुग्णालयाला राज्यमंत्र्यांनी दिला आदेश

चित्रपटगृहाबाहेर ज्यांची घरे होती, त्यापैकी काहींनी पोटापाण्यासाठी सायकली भाड्याने लावून घेण्याचा उद्योग सुरू केला होता. त्यातून दिवसाकाठी दोन-चारशे रुपये मिळायचे. चित्रपटगृहाबाहेर असलेली पानटपरी चालक, कोल्ड्रिंक्‍स, चिरमुरे फुटाणे विक्रेते आदींची चांगलीच चलती होती. एका चित्रपट गृहात डोअर किपर, ऑपरेटर, बुकिंग क्‍लार्क, स्टॅन्ड कर्मचारी, सफाई कर्मचारी, व्यवस्थापक असा १० ते १५ जणांचा स्टाफ असायचा. या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीसह इतर लाभ मिळत होते. चित्रपटगृहातील कर्मचारी संघटित होते. थिएटरमध्ये वडापाव, लाह्या, शेंगदाणे-फुटाणे, भेळ, कोल्ड्रिंक्‍स विक्री करणाऱ्यांचे सुगीचे दिवस होते. चित्रपट हाऊसफुल्ल चालला की मालकांसह सर्वांचा गल्ला चांगला जमत होता.

प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी नवा चित्रपट कोणता प्रदर्शित होणार? की चालू चित्रपट आणखी किती आठवडे चालणार? याचे गणित घातले जात होते. चित्रपटांचे पोस्टर डिजिटल प्रिटिंगमध्ये येण्यापूर्वी पेंटर लोकांनाही खूप काम होते. चित्रपटातील हिरो-हिरोईनला हुबेहूब रेखाटताना कसब पणाला लागायचे; परंतु डिजिटल क्रांतीनंतर त्यांचा कौशल्यावर बेरोजगारीचा फटकारा बसला. प्रत्येक थिएटरमधील १० ते १५ कर्मचारी याप्रमाणे जिल्ह्यातील चित्रपटगृहांमधील ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.