esakal | यंदाची अक्षय तृतीया सुनी सुनी 
sakal

बोलून बातमी शोधा

corona Lockout affected This year's Akshay Tritiya

गुढीपाडव्यानंतर या महिन्याच्या अखेरीस उद्या (ता.26) अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे हाही मुहूर्त टळणार असून यंदाची अक्षय्य तृतीया सुनी सुनी जाणार असल्याचे स्पष्ट आहे.

यंदाची अक्षय तृतीया सुनी सुनी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. गुढीपाडव्यानंतर या महिन्याच्या अखेरीस उद्या (ता.26) अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे हाही मुहूर्त टळणार असून यंदाची अक्षय्य तृतीया सुनी सुनी जाणार असल्याचे स्पष्ट आहे. 

साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय्य तृतीया, दसरा, दिवाळी पाडवा आणि गुढीपाडवा या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर खरेदीला पसंती दिली जाते. गुढीपाडव्याला लॉकडाऊनमुळे खरेदी न करता आल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. नियोजित वस्तुंची खरेदी अक्षय तृतीयेला करायची, असे ठरवले होते. मात्र लॉकडाऊन वाढल्यामुळे खरेदीचा आनंद घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे. 

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाहनांचे मोठ्याप्रमाणाव बुकिंग केले जाते. सांगलीच्या वाहन बाजारपेठेत सुमारे दोन हजारहून अधिक दुचाकी-चारचाकी वाहनांची विक्री होते. मात्र, हा मुहूर्त गेल्याने कोट्यवधींची उलाढाल थांबली आहे. यादिवशी प्रत्येक घरात एखादी नवीन वस्तू आणली जाते. मात्र, यंदा ही परंपरा खंडित झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशातच लॉकडाऊन केल्यामुळे बाजारपेठच बंद आहे. सराफी दुकानेही बंद असल्याने यंदा ग्राहकांना सोने व चांदीची खरेदी करता येणार नाहीत. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, वाहने, कपडे आदींची दुकानेही बंद असल्यामुळे लोकांना कोणत्याच वस्तूची खरेदी करता येणार नाहीत. जमीन, फ्लॅट किंवा घर खरेदीचे व्यवहारही थंडावले आहेत. 

आंबा खरेदीसाठी लगबग 
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर घरोघरी आंबे आणले जातात. आज आंबे खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग होती. येथील फळ मार्केटमध्येही पोलिस बंदोबस्तात विक्री करण्यात आली. तसेच भागाभागात आंबे विकले जात आहे. पाचशे रुपयांपासून सातशे रुपयांपर्यंत डझनाचे दर होते. 

नागरिकांनी घरातच रहावे

अक्षय तृतीया, गुडीपाडवा आणि दसरा या तीन मुहूर्तावर एकूण विक्रीतील चाळीस टक्के विक्री या दिवशी होते. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात तोटा झाला असला तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच रहावे, सुरक्षित रहावे.'' 
- श्रीकांत तारळेकर, संचालक, सिद्धिविनायक हिरो 

लॉकडाऊननंतर वाहने दिली जातील

लॉकडाऊनमुळे तीस टक्‍क्‍यांनी विक्रीत घट झाली आहे. सद्य:स्थितीत आम्ही ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करण्यास सुरवात केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लॉकडाऊननंतर त्यांना ती वाहने दिली जातील.
- सतीश पाटील, सरव्यवस्थापक, माय ह्युंदाई 
 

loading image