कार्यालयांचे "कोरोना पॅकेज'; लग्न समारंभ आता सामान्यांच्या बजेटमध्ये

"Corona Package" : Wedding Ceremony Now in Common man's Budget
"Corona Package" : Wedding Ceremony Now in Common man's Budget

सांगली : शुभ कार्याला टाळेबंदीमुळे विघ्न आले. त्यामुळे शुभ मंगल करतानाही सावधानता बाळगण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. कोविडमुळे रखडलेल्या लग्नाचा बार उडवण्यासाठी केवळ 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी मिळाली आहे. मंगल कार्यालयात शाही थाटात होणाऱ्या विवाहांना आता नियमावली लागू करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे आता कार्यालयांनीही विशेष पॅकेज देत घसघसशीत सूट देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लग्न समारंभ आता सामान्यांच्या बजेटमध्ये होत आहेत. 

कोविडमुळे सण, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय मेळावे, सभा यासह शुभ कार्ये ठप्प आहेत. मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट गहिरे होत असतानाच लॉकडाउन वाढता वाढता वाढत आहे. परिणामी बाजारपेठेवर त्याचा मोठा परिणाम दिसत आहे. टाळेबंदीमुळे मंगल कार्यालयेही ओस पडली आहेत. मार्च, एप्रिल, मे व जून हे चार महिने लग्नसराई, शुभ कार्याचे असतात. लग्न, मुंज, स्वागत समारंभ, वाढदिवस यासह अन्य शुभकार्यासाठी बुकिंग केलेल्या मंगल कार्यालयात तीन महिने सन्नाटा होता. त्यामुळे मंगल कार्यालयांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. 

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर लग्न समारंभाला मोजक्‍याच म्हणजे दोन्ही बाजूच्या 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे कार्यालय चालकांवरही बंधने आली. मर्यादित स्वरुपात होणारी कार्ये कार्यालय व्यवस्थापनाला परवडत नसली तरी बंद ठेवण्यापेक्षा पॅकेज देउन सुरु करण्याची टूम निघाली. त्यानुसार मंडप, रोषणाई, स्टेज डेकोरेशन, ढोली, घोडा, तुतारी, बग्गी, बॅंड, वाद्यवृंद, फटाक्‍यांना पूर्ण फाटा देण्यात येत आहे. टाळेबंदीमुळे बिग बजेट असूनही हायप्रोफाईल सण, समारंभाला मुकले. मोठ्या कार्यालयातील समारंभ आता छोटेखानी हॉलमध्ये आल्याने शुभकार्यातील उत्साह कमीच आहे. सोशल डिस्टनिंसगमुळे ठराविक अंतर ठेवूनच अक्षता रोपण, हळदी, भोजन पार पडत आहे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचे नाव, पत्ता, फोन क्रमांक घेतला जात आहे. त्याचप्रमाणे मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. 

शहरातील कार्यालयांची सद्यस्थिती व अर्थकारण 

  • मंगल कार्यालये - सुमारे 100 
  • छोटे हॉल, सभागृहे - 40 
  • वर्षातील सरासरी समारंभ - सुमारे 70 ते 100 
  • एका समारंभाचा खर्च - 3 ते 15 लाख रुपये 
  • सध्याचे पॅकेज - 30 हजार ते 50 हजार 
  • पॅकेजमध्ये हे मिळणार - 50 लोकांचे जेवण, नाष्टा, चहा 
  •  कोरोनामुळे कार्यालयाच्या सोयी - तापमान तपासणी, सॅनिटायझर, हॅंडवॉश 
  • चौकट 

लग्न 30 हजारात...बारसे, जावळ, रिसेप्शन मोफत 
सांगलीत वाडीकर मंगल कार्यालयाने स्पर्धेत टिकण्यासाठी लॉकडाउन ऑफर आणली आहे. विश्रामबाग येथील कार्यालयाचे भाडे पूर्णपणे माफ करत 50 लोकांचे भोजन, वाढपी, भटजी व अन्य खर्चाचे खास पॅकेज बनवले आहे. त्यानुसार कमीत कमी म्हणजे 30 हजारात लग्न समारंभ होताहेत. गावभागातील दत्त मंगल कार्यालयात जेवणाचा खर्च वगळता जावळ, बारसे, डोहाळ जेवण यासह स्वागत समारंभही पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याचे संचालक निखिल पुजारी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com