सांगलीला धक्का, सावली निवारा केंद्रात कोरोना 

अजित झळके
Friday, 10 July 2020

सावली निवारा केंद्रातील संशयित रुग्ण तीन दिवसांपूर्वी येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता.

सांगली ः सांगली शहराला धक्का देणारी बातमी आज दुपारी समोर आली. या शहरात बेघरांचे घर म्हणून स्थापन करण्यात आलेल्या सावली निवारा केंद्रातील एका वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. आपटा पोलिस चौकीजवळ असलेल्या या केंद्रात सत्तरहून अधिक लोक राहतात आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी दहाहून अधिक लोकांची टीम तेथे काम करते. महापालिका, सामाजिक संस्था आणि देणगीदारांच्या मदतीतून चालणाऱ्या या केंद्राच्या संपर्कात अनेक लोक असल्याने भितीचे वातावरण तयार झाले आहे. 
सावली निवारा केंद्रातील संशयित रुग्ण तीन दिवसांपूर्वी येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. त्यातून त्याला लागण झाल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने तत्काळ तिथे धाव घेत हा भाग सीलबंद केला आहे. या केंद्रात काम करणाऱ्यांसह सर्व आश्रितांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

काय आहे सावली केंद्र 

सांगलीतील सामाजिक कार्यकर्ता मुस्तफा शेख याने सांगली, मिरजेसह जिल्हाभरातील बेघरांसाठी काम सुरु केले. रस्त्याकडेला भीक मागणारे, मानसिक संतूलन बिघडल्याने भटकणाऱ्या लोकांचा मुस्तफा मसिहा झाला. त्याच्या या कामाला समाजातून मदतीचा हात लागला. महापालिकेने या लोकांच्या निवाऱ्याची सोय करत आपटा पोलिस चौकीजवळील बंद अवस्थेतील महापालिकेची शाळा मोकळी करून दिली. तेथे वाढता वाढता सत्तरहून अधिक आश्रिय दाखल झाले आहेत. या लोकांना औषधोपचार, जेवण खाणे सारी सुविधा पुरवली जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive in sawali nivara kendra sangli