ना शाळा, ना परीक्षा ; 'डिजीटल' शिक्षणाची होतीये पायाभरणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 December 2020

संकटाने डिजीटल शिक्षणाची पायाभरणी झाली, मात्र त्यासाठी खूप काम करावे लागेल

सांगली : कोरोना संकटाने यावर्षी जगाला धडा शिकवला. त्यामुळे शाळेत 'धडा' शिकण्याची संधीच मिळाली नाही. 15 मार्च रोजी शाळा बंदचा निर्णय झाला आणि हे वर्ष सरत असताना शिक्षण व्यवस्था कधी पूर्ववत होईल, याचे भलेमोठे प्रश्‍नचिन्ह कायम आहे. या संकटाने डिजीटल शिक्षणाची पायाभरणी झाली, मात्र त्यासाठी खूप काम करावे लागेल, सर्वसामान्यांपासून हे शिक्षण खूप दूर आहे, याची जाणीवही करून दिली.

चालू शैक्षणिक वर्ष 'शून्य' पकडायचे की काही नवा मार्ग शोधायचा, यावर अभ्यास सुरु आहे. गेली नऊ महिने मुले घरात आहेत. ती गुदमरत आहेत. नववी ते बारावीचे वर्ग भरले खरे, मात्र त्यातील हजेरी अवघी 35 टक्के आहे. 65 टक्के विद्यार्थी अजून शिक्षण प्रवाहातून दूरच राहिले आहेत. दहावी, बारावीची परीक्षी परीक्षा मे महिन्यात होईल, त्यासाठी आवश्‍यक अभ्यासक्रमच समाविष्ट केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. नवीन वर्ष त्याबाबतची उत्सुकता घेऊन उगवेल.

हेही वाचा -  गुंतवणुकीच्या अमिषाने भामट्यांनी घातला पावणेदोन कोटींचा गंडा -

प्रश्‍न उरतो प्राथमिक शिक्षणाचा आणि चालू वर्षाचे करायचे काय? हे शून्य वर्ष पकडले जावे, असा काहींचा सूर आहे. तर शून्य शैक्षणिक वर्ष ही संकल्पनाच चुकीची असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यातून कसा मार्ग निघतो, यावर या बालचमुंचे शैक्षणिक भवितव्य ठरणार आहे. 

सरत्या वर्षाने डिजीटल शिक्षणाचा पाया भरला. याआधी 'मोबाईल ठेव आणि अभ्यासाला बस', हा पालकांचा सूर असायचा. आता 'मोबाईल घे आणि अभ्यासाला बस' असा सूर बदलला आहे. मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला नाही, मात्र त्याला एक पायवाट तयार केली आहे. आता भविष्यातील शिक्षण पद्धतीचा तो राजमार्ग बनू शकेल, अशी परिस्थिती आहे. 

वैद्यकीय परीक्षा झाल्या 

वैद्यकीय शिक्षणात "कोरोना पासआऊट' हा शिक्का विद्यार्थ्यांना नको होता. त्यामुळे परीक्षा व्हावी, असा प्रयत्न होता. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर परीक्षा झाल्या आणि विद्यार्थ्यांनी निश्‍वास सोडला. 

शिष्यवृत्ती थांबली 

प्राथमिक शिक्षणातील विद्यार्थ्यांची दर्जात्मक कसोटी पाहण्यासाठी जिल्हा परिषदेने डॉ. पतंगराव कदम गुणवत्ता परीक्षा सुरु केल्या. त्या उद्या होणार हे निश्‍चित झाले होते, त्याही रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची पूर्ण तयारी झालेली असताना परीक्षा रद्द झाल्याने शिक्षक आणि विद्यार्थी हिरमुसले. 

हेही वाचा - ‘तू माझ्याशी चॅटिंग केले आहेस, थांब तुझी दिल्लीत तक्रार करतो म्हणत घातला सव्वातीन लाखांना गंडा -

स्पर्धा परीक्षा तारखांचा खेळ 

लोकसेवा आणि राज्य सेवा परीक्षांच्या तारखांचा प्रचंड घोळ यावर्षी पहायला मिळाला. अगदी तारखा निश्‍चित झाल्या, केंद्र ठरले आणि कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नामुळे परीक्षा लांबणीवर पडल्या. स्पर्धा परीक्षेतून करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष मानसिक दडपणाचेच ठरले. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona situation schools closed and digital study start in sangli