हे काय भलतंच, कोरोनामुळे वाचला कोंबड्यांचा जीव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

एकंदर कोरोना मानव जातीच्या जीवावर उठला आहे. दररोज बळींवर बळी जात आहेत. मात्र, याच कोरोना विषाणुंमुळे कोंबड्यांचा जीव वाचला आहे. आणि दुसरीकडे पोल्ट्रीचालकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

नगर ः कोरोनाच्या विषाणुमुळे संपूर्ण जगच हादरून गेले आहे. चीन सरकार तर गलितगात्र झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही आणीबाणी जाहीर केली आहे. एकंदर कोरोना मानव जातीच्या जीवावर उठला आहे. दररोज बळींवर बळी जात आहेत. मात्र, याच कोरोना विषाणुंमुळे कोंबड्यांचा जीव वाचला आहे. आणि दुसरीकडे पोल्ट्रीचालकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. नगर जिल्ह्यासह राज्यात बहुतांशी भागात हीच स्थिती आहे. कोरोनामुळे अशी भलतीच स्थिती निर्माण झाली आहे. 

अर्थकारणावर परिणाम 
कोरोना विषाणूचे काही रूग्ण भारतात आढळल्याचे सांगितले जाते. केरळमध्ये एका रूग्णाचा त्या विषाणुमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रातही काही रूग्ण असल्याच्या अफवा पसरविल्या जातात. सोशल मीडियातून याची सर्वाधिक वाच्यता होते. महाराष्ट्रात गंभीर स्थिती नसली त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. 

चिकन सेंटरवरील गर्दी ओसरली 
कोरोनाच्या विषाणूची बाधा कोंबड्यांचे मटन खाल्ल्याने होते, असे मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात फिरत आहेत. याचाच धसका घेऊन अनेक मांसाहार करणाऱ्यांनी आपल्या जीभेला मुरड घातली आहे. परिणामी चिकन सेंटरवरील गर्दी रोडावली आहे. भीतीपोटी गर्दी होत नसल्याने काही दुकानदारांनी चिकनचे भाव कमी केले आहेत. तरीही लोक चिकन खाण्यास धजावत नाहीत. मागणीच नसल्याने पोल्ट्रीमालक धास्तावले आहेत. दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरविल्या जातात, असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. 

सोशल मीडियात फाजिलपणा.. 
सोशल मीडियात याचीही खबर आहे, ते पोल्ट्रीचालकांच्या या स्थितीचीही ट्रोल करून मजाक घेत आहेत. "कोरोनामुळे माणसांचा जीव जात असला तरी कोंबड्यांचा जीव वाचत आहे... त्यांचे किमान आजचे मरण उद्यावर गेले आहे... अशा प्रकारचा फाजिलपणा त्या मंडळींकडून होत आहे. 

यांना रोखा कोणीतरी.. 
अनेक जिल्ह्यातील पोल्ट्रीचालक एकत्र आले आहेत. त्यांनी काही ठिकाणी तर थेट पोलिसांत तक्रार दिली आहे. सोशल मीडियात कोरोनाबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी, असे त्यांचे म्हणणे आहे.

काय संबंध कोरोना आणि कोंबडीचा 
चैतन्य पोल्ट्री फिडस अँड हॅचरीजचे संचालक संतोष कानडे म्हणतात, कोंबड्यांपासून कोरोना होत असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने खोडून काढला आहे. खरे तर कोणताही मांसाहार आपल्याकडे उकडून घेतला जातो. 100 अंश डिग्रीला कोणताही विषाणू जगत नाही. मुळात कोंबड्या आणि कोरोनाचा काहीही संबंध नसताना अफवा पसरविल्या जात असल्याने लोकांच्या मनात भीती बसली आहे. मात्र, कोरोना आणि चिकन यात काहीही तथ्य नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona survived chicken lives