कोरोना व्हायरसचे ग्रहण कुस्ती क्षेत्रालाही 

धनंजय दौंडे
Wednesday, 29 April 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी प्रशासनाने केलेल्या लॉक डाऊनमुळे जिल्ह्यातील पैलवानांना मात्र या कोरोनाने चितपट केल्याचे चित्र आहे. 

कुंडल, ता. 28 : कोरोना व्हायरसचे ग्रहण कुस्ती क्षेत्र व मल्लांना ही लागल्याचे चित्र आहे. नामवंत मैदाने रद्द होत असल्याने व भविष्यातही मैदाने लवकर होणार नसल्याने मोठा फटका बसणार आहे. आता शासनाने कुस्ती क्षेत्रातील उदयोन्मुख अशा गरजू मल्लांना मदत करावी, अशी मागणी होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी प्रशासनाने केलेल्या लॉक डाऊनमुळे जिल्ह्यातील पैलवानांना मात्र या कोरोनाने चितपट केल्याचे चित्र आहे. 

कुस्ती हा यष्टी आणि बुद्धीचा खेळ आहे. या कुस्ती खेळाचे प्रदर्शन विशेषतः यात्रांमध्ये जास्त केले जाते, जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर अशी अनेक नामवंत मैदाने आहेत की जिथे हे पलूस तालुक्‍यातील मल्ल आपला खेळ दाखवण्यासाठी जात असतात. या कुस्ती खेळात सामान्य कुटुंबातीलच मुले असल्याने या खेळावर त्यांच्या घराचा ही कारभार चालत असतो. त्याच बरोबर या कुस्ती प्रदर्शित करण्याच्या काळासाठी हे पैलवान मंडळी आतुरतेने जवळपास 9 महिने वाट बघत सराव करत असतात. या 9 महिन्यांच्या काळात त्यांना जवळपास प्रत्येकी एक लाख रुपायांचा खुराक आवश्‍यक असतो तो ही या यात्रांमधूनच ते जमवतात. 

पलूस तालुक्‍यात जवळपास 400 पेक्षा जास्त पैलवान दररोज आपल्या शरीराचा कस लावून कुस्तीचा सराव करतात. यातून बरेचसे मल्ल हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ही खेळलेले आहेत. आपल्या खेळाचे प्रदर्शन करण्यासाठीच्या यात्रा ह्या साधारण गुढी पाडव्यापासून सुरू होत असतात आणि त्या आशेवर हे पैलवान मंडळी डोळा लावून बसलेले असतात आणि सराव करत असतात, परंतु यावर्षी अगदी कुस्तीचा हंगाम सुरू होणार तेवढ्यातच कोरोना विषाणूच्या संकटाने तोंड वर काढले आणि पैलवानांच्या तोंडातील घास हिसकावून घेतला. कुस्ती केंद्रे बंद झाली. कुस्त्यांची मैदाने रद्द झाले. यामुळे वर्षभर केलेली सगळी मेहनत पाण्यात गेली. त्यामुळे खुराक बंद झाला, संचार बंदी असल्याने व्यायामावर ही गदा आली. त्यामुळे पैलवानांना सुस्तपणा आला आहे. या खेळात सातत्य असणे आवश्‍यक असते त्या सातत्यात आता खंड पडला आहे. 

तालुक्‍यातून कुंडल येथील क्रांती कुस्ती केंद्रात 125 मल्ल, पलूसच्या हनुमान व्यायाम शाळा आणि कुसमेखा व्यायामशाळेत मिळून 60 मल्ल, याशिवाय प्रत्येक गावातील लहान-मोठ्या तालमीत असंख्य पैलवान सराव करत आहेत. येथील क्रांती कुस्ती केंद्रात सांगली, सातारा, कऱ्हाड, बीड, सोलापूर, येथील मल्ल धडे घेत आहेत. पलूस तालुक्‍यातील तुषार निकम, ओंकार मदने, गौरव हजारे, सनी मदने, अनिकेत गावडे, अंकुश माने, विराट सुतार, अक्षय कदम, रोहन भोसले, बाळा इनामदार, उदय लोंढे, संदीप बोराटे, शरद दामनकर, मंगेश माने, अमर पाटील यांच्यासह अनेक मल्लांनी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आपल्या खेळाची चुणूक दाखवली आहे. 

परंतु या बुद्धी आणि यष्टीच्या कुस्ती खेळ सध्या अडचणीत आहे. या सराव करणाऱ्या पैलवानांना सराव नाही, घरची परिस्थिती बेताची असल्याने आवश्‍यक खुराक नाही, मैदाने रद्द झाली आहेत, तसेच वाढत्या तापमानामुळे त्यांच्या वजनात ही कमालीची घट होत आहे. अशा पद्धतीने या खेळाला जिवंत ठेवण्यासाठी शासनाने मदत करणे आवश्‍यक आहे. त्यांचे सराव सुरू ठेवणे शक्‍य नसले तरी किमान त्यांच्या खुराकाची तरी व्यवस्था करावी अशी मागणी सध्या पैलवानांकडून होत आहे. 

खुराकासाठी पुढाकार घ्यावा

क्रांती कारखाना क्रांती कुस्ती केंद्रातील मल्लांना शक्‍य तेवढी मदत करत आहे. परंतु इतर संस्थांनी ही त्यांच्या खुरकासाठी पुढाकार घ्यावा. 
- अरुणअण्णा लाड, प्रमुख क्रांती उद्योग समूह, कुंडल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus affected the wrestling field also