अकोेल्याच्या कन्येचे किट ओळखणार कोरोना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

तालुक्‍यातील पिंपळदरी या लहानशा खेड्यातील शीतलने बायोटेक्‍नॉलॉजी विषय घेऊन एमएस्सी केले. गेल्या तीन वर्षांपासून ती "इम्युनो सायन्स' या कंपनीत संशोधन व विकास विभागाची प्रमुख म्हणून कार्यरत आहे. तिचे पती व्यावसायिक आहेत.

अकोले : कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे किंवा नाही, याचे 15 मिनिटांत अचूक निदान करण्यासाठी पुण्याजवळील कुसगाव येथे असलेल्या "इम्युनो सायन्स' या कंपनीने "रॅपिड टेस्टिंग किट' तयार केले असून, त्याला पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने मान्यताही दिली आहे. हे रॅपिड टेस्टिंग किट' तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तालुक्‍यातील शीतल रंधे-म्हाळुनकर या तरुणीने. "कोरोना वॉरिअर' ठरलेल्या शीतलच्या या यशाचे तालुक्‍यात कौतुक होत आहे. 

हेही वाचा - जामखेडला कोरोनाचा धोका वाढला

तालुक्‍यातील पिंपळदरी या लहानशा खेड्यातील शीतलने बायोटेक्‍नॉलॉजी विषय घेऊन एमएस्सी केले. गेल्या तीन वर्षांपासून ती "इम्युनो सायन्स' या कंपनीत संशोधन व विकास विभागाची प्रमुख म्हणून कार्यरत आहे. तिचे पती व्यावसायिक आहेत. एचआयव्हीसह विविध रोगांचे, तसेच प्रेग्नन्सीचेही निदान करणारे टेस्ट किट तयार करणाऱ्या या कंपनीने कोरोनाच्या उद्रेकानंतर कोरोनाचे निदान करणारे किट तयार करण्याचे ठरविले. त्यासाठीच्या संशोधनाची जबाबदारी शीतल रंधे आणि त्यांचे सहकारी अवधूत सातपुते, ललित बारावकर, वर्षा गुंजाळ, हनुमंत गोयंकर यांच्यावर सोपविण्यात आली.

या सर्वांनी मिळून किट तयार केले असून, त्याला राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने मान्यताही दिली आहे. कंपनीतर्फे लवकरच हे रॅपिड टेस्टिंग किट उपलब्ध होणार असून, त्याद्वारे 12 ते 15 मिनिटांत कोरोनाचे निदान होणे शक्‍य होणार असल्याचे शीतल रंधे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

धामणगाव पाट येथे माध्यमिक शिक्षक असलेले शीतलचे वडील हौशीराम रंधे यांनी सांगितले, की लहानपणापासून शीतलला संशोधनाची आवड होती. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण अकोल्याच्या कन्या विद्यालयात झाले. पुणे येथे बीएस्सी व एमएस्सी (बायोटेक)चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने "इम्युनो सायन्स' या कंपनीत नोकरी सुरू केली. तिच्या या यशाचा आम्हाला आनंद आहे. 

कष्टाचे चिज झाले

जिद्दीने अहोरात्र केलेल्या संशोधनाला राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून हिरवा कंदील मिळाल्याने आमच्या कष्टाचे चीज झाले. कोरोनासारखे आजार पुन्हा उद्‌भवू नयेत, यासाठी आमचे संशोधन यापुढेही सुरूच राहील. - शीतल रंधे-म्हाळुनकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona will recognize Akola's daughter's kit