कोरोनाचा फटका; शिबिरे-रक्तदात्यांची संख्या घटली 

जयसिंग कुंभार
Friday, 18 December 2020

कोरोनाच्या धास्तीने सांगली जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना रक्त पुरवठ्यांची मोठी टंचाई जाणवत आहे.

सांगली ः कोरोनाच्या धास्तीने जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना रक्त पुरवठ्यांची मोठी टंचाई जाणवत आहे. कोरोना रुग्णसंख्या घटल्याने आता शिबिरांची संख्या पुर्ववत होत असली तर त्यातील रक्तसंकलनाची स्थिती मात्र बिकटच आहे. आता शस्त्रक्रियांची संख्याही पुर्ववत होत आहे मात्र रक्तपुरवठा अद्याप पुर्वपदावर आलेला नाही. 

जिल्ह्यातील एकूण 16 खासगी संस्थाच्या आणि सांगली आणि मिरज सिव्हिल रुग्णालयांच्या दोन सरकारी रक्तपेढ्या आहेत. कोरोना सत्र सुरु झाल्यानंतर रक्त पुरवठा आणि मागणी दोन्ही कमी झाली. गेल्या जुलै-ऑगस्टमध्ये कोरोना टिपेवर असताना रक्तपेढ्यांचा विस्कळीत झालेला पुरवठा अद्यापही पुर्वपदावर आलेला नाही. जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी विशेष आवाहन केल्यानंतर राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांकडून काहीसा अनुकूल प्रतिसाद मिळाल्याने स्थिती सुधारली. मात्र अद्यापही महाविद्यालये सुरु नाहीत. यंदा राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आहेत. त्यामुळे शिबिरे आयोजनांच्या संख्येवरही मर्यादा आली आहे. 

जिल्ह्याची सध्याची सरासरी शंभर ते सव्वाशे रक्तपिशव्यांची गरज आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात एक टक्का इतकी वार्षिक रक्तपिशव्यांची गरज असते. म्हणजे जिल्ह्याच्या तीस लाख लोकसंख्येमागे तीस हजार रक्तपिशव्यांची गरज असायला हवी. प्रत्यक्षात सांगली-मिरजेतील दवाखान्यांची संख्या, कर्नाटक आणि शेजारच्या जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांमुळे जिल्ह्याला दरवर्षी सुमारे अपेक्षेपेक्षा दुपटीने रक्ताची गरज भासते. गतवर्षी अठरा रक्तपेढ्यांनी 57 हजार 890 रक्तपिशव्यांचे संकलन केले होते. यंदा गेल्या एप्रिलते ऑक्‍टोबरपर्यंतची आकडेवारी विचारात घेतली तर 22 हजार 184 रक्तपिशव्यांचे संकलन झाले आहे. कोरोनामुळे संकलनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. या काळात शिबिरांची संख्येत फारशी घट नाही मात्र शिबिरातील रक्‍तदात्यांची संख्या कमी झाली आहे. 

संकलनावर मर्यादा

आमच्या रक्तपेढीची रोजची 20 ते 25 पिशव्यांची गरज आहे. सध्या पाच ते दहा पिशव्यांचे संकलन होत आहे. नाईलाजाने खासगी रक्तपेढ्यांकडे रुग्णांच्या नातेवाईकांना पाठवावे लागतेय. आता शस्त्रक्रियांची संख्या पुर्वपदावर आली आहे. महाविद्यालये बंद असल्याने संकलनावर मर्यादा आल्या आहेत. रक्तदात्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी शिबिरांसाठी संपर्क साधावा.
- डॉ. महेश गायकवाड, रक्त संक्रमण अधिकारी सांगली सिव्हिल रुग्णालय 

भिती बाळगण्याची गरज नाही

रक्त संकलनाच्या स्थितीत गेल्या पंधरा दिवसात सुधारणा आहे. पुढील आठवडाभरात दोन शिबिरे आहेत. मात्र असे सातत्य राहण्याची गरज आहे. तीन ते चार दिवसाच्या गरजेचा हा स्टॉक आहे; जो प्रत्यक्षात आठवडाभराचा असायला हवा. रक्तदात्यांनी भिती बाळगण्याची गरज नाही.
- डॉ. यशवंत शेंडे, रक्त संक्रमण अधिकारी मिरज सिव्हिल 

रक्तदानासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे
रक्त दान होत असले तरी त्याचे संकलन, तपासणी आणि साठवणुकीचा खर्च मोठा आहे. निर्धोक रक्तपुरवठ्यासाठी आता अद्ययावत चाचण्यांची अपेक्षा वाढली आहे. संस्थाच्या रक्तपेढ्यांसाठी शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही. हे रक्तदात्यांनी समजून घेतले पाहिजे. रक्तदानासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे.
- डॉ. मुकुंदराव पाठक, वसंतदादा रक्तपेढी मिरज 

स्पष्टता नाही 
कोरोनामुक्त रुग्णांनी किमान तीन ते चार महिने रक्तदान करु नये असे डॉक्‍टर सांगत आहेत. याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेकडून मात्र स्पष्ट मार्गदर्शक सूचना अद्याप मिळालेल्या नाहीत. कोरोनाच्या धास्तीबरोबरच रक्तदानावर परिणाम होण्याचे हेदेखील एक कारण असल्याचे डॉक्‍टरांचे मत आहे. रक्तदान शिबिरे आणि रक्तदानाबाबत कोरोना मार्गदर्शक सूचना तातडीने शासनाकडून दिल्या जाव्या अशी अपेक्षाही वैद्यकीय विश्‍वाची आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's effect; The number of camp-blood donors decreased