पन्हाळगडी शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात

Coronation of Shambhuraje on panahala
Coronation of Shambhuraje on panahala

पन्हाळगडी शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात 

पन्हाळा (कोल्हापूर) ः आज सकाळची वेळ... गारठ्याची चुणूक दाखवणारी... सकाळी आठपासूनच येथील ताराराणी राजवाड्यासमोरील शिवमंदिरात भगवा फेटा बांधलेल्या आणि अष्टगंध ल्यायलेल्या मावळ्यांची गर्दी होऊ लागली... स्थानिक "रौद्र शंभो' ढोलताशा पथकाचा दंडुका ढोलावर पडला... आणि युवकांच्या हातातील भगवा ध्वज हवेत फडफडू लागला... आणि अवघे वातावरण थरथरले.. "जय शिवाजी जय संभाजी'च्या उत्स्फूर्त घोषणा युवकांच्या तोंडून उमटू लागल्या... बघता बघता राजवाडा परिसर लोकांनी फुलून गेला, नि शिवाजी महाराजांच्या मंदिरासमोरून सजवलेल्या पालखीत विराजमान केलेल्या संभाजीराजेंच्या पुतळ्यासह मिरवणूक निघाली. पारंपरिक मैदानी खेळ, ढोल ताशा पथक, पारंपरिक वेषातील मुली, मुले आणि मावळे आणि त्यामागे चौऱ्या ढाळत धीम्या गतीने निघालेली पालखी नि सगळ्यात शेवटी संजीवन, पन्हाळा विद्यामंदिर, समर्थ बालमंदिरचे विद्यार्थी नि गावकरी. बसस्थानक, संभाजी महाराज मंदिर, बाजीप्रभू पुतळा मार्गे मिरवणूक नगरपरिषदेच्या इंटरप्रीटिशन हॉलमध्ये आली आणि सुरू झाला अभिषेक. 
निमित्त होते, छत्रपती शंभूराजे ट्रस्ट आणि पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित 339 व्या छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक सोहळ्याचे. 
"राष्ट्र जगते ते इतिहासावर, त्यामुळे इतिहास जगवा', आपलाच इतिहास आपल्याला माहीत नाही, तो माहीत व्हावा म्हणून छत्रपती शंभूराजे राज्याभिषेक सोहळ्यासारखे कार्यक्रम होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन नंतर पुढच्या तीन पिढ्यांनी म्हणजे संभाजीराजे, राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांनी स्वराज्य सांभाळले आहे. त्यांचा इतिहास नव्या पिढीला माहीत होणे गरजेचे आहे. त्याच दृष्टीने आज प्रेरणादायी पन्हाळगडी होणाऱ्या सोहळ्याला वेगळे महत्त्व असल्याचे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्‍त केले. शिवाजी महाराजांपेक्षा संभाजीराजेंना बाह्य आणि अंतर्गत शत्रूशी लढा द्यावा लागला, तेही तब्बल 9 वर्षे. तरीही संभाजीराजे घाबरले नाहीत. औरंगजेबाला संभाजीराजेंच्या पराक्रमामुळे आपल्या डोक्‍यावरची पगडी उतरून फेकावी लागली. अशा या थोर राजाचा इतिहास सगळ्यांना कळणे गरजेचे आहे. पन्हाळगडाची वास्तू ही पवित्र आहे, तिच्यामागे जाज्वल्य इतिहास आहे. तिचे पावित्र्य जपा.'' 
विविध क्षेत्रात ठसा उमटवलेल्या पन्हाळा विद्यामंदिरच्या स्नेहल कदम, जान्हवी कोरे, मृदुला माने, गायत्री बांदिवडेकर, पूनम खांबे यांच्या हस्ते विविध नद्यांतील पाण्याचा संभाजीराजेंच्या पुतळ्याला जलाभिषेक घातला. उदय संखे आणि उल्का संखे यांनी लिहिलेल्या "शंभूप्रताप दिनविशेष' या ग्रंथाचे प्रकाशन शाहू महाराजांच्या हस्ते झाले. 
ट्रस्टचे अध्यक्ष अमरदादा जाधवराव, नगराध्यक्षा रुपाली धडेल, उपनराध्यक्ष चैतन्य भोसले, मुख्याधिकरी कैलास चव्हाण यांच्यासह शंभूप्रेमी तसेच नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. दरम्यान काल रात्री "जागर इतिहासाचा, इतिहास अभ्यासकांसोबत' हा कार्यक्रम झाला. 

आमदार उशिरा 
पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार विनय कोरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते; पण ते नेहमीप्रमाणे कार्यक्रम संपल्यानंतर आल्याने त्यांनी फक्‍त प्रतिमापूजन केले आणि आयोजकांचे आभार मानून निघून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com