Coronavirus : सातारा : कॅलिफोर्नियातील प्रवासी रुग्णालयात दाखल; नागरीकांनी घरीच थांबावे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

सुचनांचे तंतोतंत पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास ‍नियमानुसार कारवाई करुन संस्थात्मक विलगीकरण कक्षात स्थलांतरीत करण्यात येईल. तसेच साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 कलामान्वये संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.

सातारा  : सातारा जिल्ह्यात कॅलिफोर्निया येथून आलेल्या एका ज्येष्ठ (वय 63) पुरुषास ताप व घसा दुखी असल्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये तातडीने विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या संशयित रुग्णाचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान आज (साेमवार) एकूण दाेन संशियत रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. नागरीकांनी घाबरुन जाऊ नये. घरी राहूनच काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले आहे.

नागरीकांनी घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने हवेशीर आणि वेगळी खोली ज्याला संडास बाथरुम जोडलेले आहे अशा खोलीमध्ये रहावे. जवळचे नातेवाईक यांनी शक्यतो त्या रुममध्ये राहू नये व आवश्यक असलेल्या सेवा देवून नजीकच्या रुममध्ये थांबावे. अगदीच अत्यंत आवश्यक असल्यास त्या खोलीमध्ये राहणार असेल तर त्यांना रुग्णापासून कमतीत कमी एक मिटर अंतरावर रहावे.
 
परदेशत दौऱ्यावरुन आल्यानंतर नागरिकांनी स्वत:हून शासकीय आरोग्य यंत्रणेस संपर्क साधून माहिती कळविणे बंधनकारक आहे. परदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर 104 क्रमांकावर स्वत:ची आरोग्य विषयक माहिती कळविणे बंधनकारक राहील. त्यामध्ये कोरोना सदृष्य आजाराची प्राथमिक लक्षणे आढळल्यास स्वत:हून नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी करावी व आवश्यकतेनुसार भरती व्हावे. अशा व्यक्तीने घरातील वृद्ध, गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये. अशा व्यक्तीने त्याचा वावर सिमित ठेवावा. अशा व्यक्तींनी कोणत्याही परिस्थितीत गर्दीच्या ठिकाणी जावू नये. अशा व्यक्तीने अल्कोहलयुक्त हॅन्ड सॅनिटायझर किंवा साबण आणि पाण्याने वारंवार व्यवस्थीत हात धुवावे. अशा व्यक्तीने वापरलेले ताट, पाण्याचे ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरुन, गादी आणि इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तू घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देवू नये. अशा व्यक्तींनी पूर्णवेळ सर्जिकल मास्कचा वापर करावा. मास्क 6 ते 8 तासांनी बदलावा आणि वापरलेल्या मास्कची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरु नये. अशा व्यक्तींनी त्यांची सुश्रुषा करणाऱ्या व्यक्तीने निकट सहवासातांनी घरातील सुश्रुषादरम्यान वापरलेले मास्क 5 टक्के ब्लिच सोल्युशन किंवा 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जंतुक करुन त्याची जाळून विल्हेवाट लावण्यात यावी.

 Coronavirus : ' त्या ' आरोग्य कर्मचाऱ्याचाही रिपोर्टही आला; एक महिला दाखल

घरी विलगीकरण केलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सूचना
एकाच नातेवाईकाने अशा व्यक्तीची सुश्रुषा करावी. अशा व्यक्तीच्या शरिराशी थेट संपर्क येणे टाळावे आणि त्याचे वापरलेले कपडे झटकु नये. घरातील विलगीकरण कक्षाची स्वच्छता करतांना किंवा अशा व्यक्तींचे वापरलेले कपडे हाताळतांना डिसपोजेबल ग्लोव्हजचा वापर करावा. डिसपोजेबल ग्लोव्हज काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावे. नातेवाईकांनी अभ्यागतांना अशा व्यक्तींना भेटू देवू नये. घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेल्या व्यक्तींना जर कोव्हीड-19 बाबत लक्षणे आढळून आली तर त्याच्या निकट संपर्कात असलेल्या सर्व व्यक्तींना 14 दिवस घरातील विलगीकरण कक्षात ठेवावे. पुढील 14‍ दिवस किंवा अशा व्यक्तींचा प्रयोग शाळा अहवाल निगेटीव्ह येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा. 

घरच्यास्तरावरील विलगीकरण कक्षाची स्वच्छता

घरात केलेल्या विलगीकरण कक्षातील असलेल्या व्यक्तीच्या खोलीमध्ये वारंवार हातळल्या जाणाऱ्या वस्तुंचे (फर्निचर, बेड, फ्रेम, टेबल) 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जतुकीकरण करावे. शौचालयाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण घरगुती ब्लीच किंवा फिनायलने करावी. अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेले कपडे आणि आंथरुन-पांघरुन हे घरातील डिटर्जट वापरुन वेगळे स्वच्छ धुवून वेगळे वाळवावे.
 
या सुचनांचे तंतोतंत पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास ‍नियमानुसार कारवाई करुन संस्थात्मक विलगीकरण कक्षात स्थलांतरीत करण्यात येईल. तसेच साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 कलामान्वये संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Suspected Patient Admited In Satara