कर्जतचे ते संशयित माय-लेक सिव्हिलमधून पळाले...अन

नीलेश दिवटे
मंगळवार, 24 मार्च 2020

गावकऱ्यांनी खबरदारी म्हणून त्यांना अगोदर तपासणी करा मगच गावात प्रवेश मिळेल असे बजावले. मात्र त्याच वेळी त्या दोघांना ताप,जुलाब आणि उलटया होऊ लागल्या आणि बेशुद्ध पडले

कर्जत - तालुक्यातील बेलगाव येथील मुंबईवरून परतलेल्या माय-लेकाची ग्रामस्थांनी  वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांच्या मदतीने नगर येथील जिल्हा रुग्णालयात रवानगी केली आहे. 

या बाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील बेलागाव येथील एक कुटुंब मुंबई येथे व्यावसायिक म्हणून स्थायिक झाले आहे. मात्र कोरोना चा प्रादुर्भाव सुरू झाला आणि त्या कुटुंबातील  62 वर्षाची महिला  आणि तिचा 40 वर्षीय मुलगा काल अचानक गावात प्रगट झाले. 

गावकऱ्यांनी खबरदारी म्हणून त्यांना अगोदर तपासणी करा मगच गावात प्रवेश मिळेल असे बजावले. मात्र त्याच वेळी त्या दोघांना ताप,जुलाब आणि उलटया होऊ लागल्या आणि बेशुद्ध पडले. या वेळी सगळे गावकरी जमले. मात्र कोरोनाच्या भीतीने त्या दोघांना हात लावायची कुणाची हिम्मत होईना .अखेर नगर येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. मात्र आज सकाळी त्या दोघांनी धूम ठोकीत बेलगाव गाठले. ही बातमी गावकऱ्यांच्या कानावर गेल्यानंतर मात्र ते संतापले. अखेर त्या दोघांना आज पुन्हा नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मात्र, या मुळे मिरजगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.

त्या दोघांना प्रथमदर्शनी कोरोनाबाबत लक्षणे आढळून आलेली नाहीत. तो दुसरा व्याधींचा प्रकार असावा. मात्र खबरदारी म्हणून सदर महिला व तिच्या मुलाला नगर येथे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

-डॉ संदीप पुंड, तालुका आरोग्यधिकारी ,कर्जत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corons suspected mother-son escapes civil