esakal | महापौर निवडणुकीसाठी नगरसेवक वेटिंगवर I Political
sakal

बोलून बातमी शोधा

election

महापौर व उपमहापौरपदाच्या आरक्षणाबाबतही अद्याप नगरविकास खात्याकडून स्पष्टीकरण आलेले नाही.

महापौर निवडणुकीसाठी नगरसेवक वेटिंगवर

sakal_logo
By
मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या निवडणूकीचा निकाल जाहीर होवून बुधवारी (६) एक महिन्याचा कालावधी पूर्ण होईल. पण महापौर-उपमहापौर निवडणूकीची तारीख अद्याप निश्‍चित झालेली नाही. शिवाय महापौर व उपमहापौरपदाच्या आरक्षणाबाबतही अद्याप नगरविकास खात्याकडून स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे या निवडणूकीबाबतची अनिश्‍चितता कायम आहे.

महापौरपदाच्या आरक्षणाबाबत नगरविकास खात्याकडून आधी स्पष्टीकरण मिळाले पाहिजे. त्यानंतर निवडणूक घेण्याबाबत नगरविकास खात्याकडून सूचना आली पाहिजे. त्यानंतरच निवडणूक प्रक्रिया सुरू होईल असे महापालिकेच्या कौन्सिल विभागाचे म्हणने आहे. बेळगाव महापालिकेसाठी ३ सप्टेबर रोजी मतदान झाले, तर ६ सप्टेबर रोजी मतमोजणी झाली. या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे ३५ नगरसेवक निवडून आले, त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता येणार हे नक्की आहे. पण निवडणूकीला एक महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्याप महापौर व उपमहापौर निवडणूक झालेली नाही. त्यामुळे नूतन नगरसेवकांमधील अस्वस्था वाढली आहे.

हेही वाचा: आला आता डिजिटल नंदीबैलवाला; फोटो व्हायरल

भाजपमध्ये महापौर व उपमहापौरपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे या दोन्ही पदांसाठी उमेदवार निश्‍चित करताना भाजप नेत्यांची कसोटी लागणार हे नक्की आहे. पण महापालिकेने आरक्षणाबाबत स्पष्टीकरण विचारल्यामुळे उमेदवार निश्‍चितीची प्रक्रिया तात्पुरती थांबली आहे. ६ सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यानी २३ व्या महापौर व उपमहापौरपदाच्या आरक्षणानुसार निवडणूक होईल असे जाहीर केले आहे. त्यानुसार महापौरपद सामान्य प्रवर्गासाठी तर उपमहापौरपद सामान्य महिलेसाठी राखीव आहे. त्या अनुषंगाने भाजपमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. पण दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेच्या कौन्सिल विभागाला आरक्षणाबाबत शंका निर्माण झाली. त्यांनी आधी नगरविकास खात्याकडे त्याबाबत तोंडी स्पष्टीकरण विचारले.

महापौर व उपमहापौरपदाचे कोणते आरक्षण गृहीत धरावे याबाबतचे लेखी स्पष्टीकरणही विचारण्यात आले. पण त्याला नगरविकास खात्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्याची प्रत महापालिकेने जिल्हाधिकारी व प्रादेशिक आयुक्तांनाही पाठविली आहे. नगरविकास खात्याने २१ सप्टेबर रोजी नूतन नगरसेवकांच्या नावांची नोंद राजपत्रात केली आहे. त्याआधी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महापौर, उपमहापौर व अन्य निवडणूका घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव रवीकुमार यानी त्याबाबतची माहिती नगरविकास व पंचायत राज विभागाच्या मुख्य सचिवांना दिली आहे. त्यामुळे लगेचच महापौर निवडणूकीची घोषणा होईल अशी अपेक्षा होती.

हेही वाचा: Health - केचप जास्ती खाल्ल्यास लठ्ठपणाला आमंत्रण

महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यास नगरविकास खात्याने हिरवा कंदील दाखविल्यानंतर प्रादेशिक आयुक्तांकडून तारीख जाहीर केली जाते. बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव व हुबळी-धारवाड या दोन्ही महापालिकेतील महापौर व उपमहापौरांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे दोन्ही निवडणूका एकाचवेळी होणे शक्य नाही. त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांकडून तारीख जाहीर होईपर्यंत नगरसेवकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.

loading image
go to top