बेळगावात आंतर जिल्हा प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ; आरोग्य विभागाने घेतला हा निर्णय...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

कर्नाटकातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्यांसाठी विलगिकरणाची सक्ती नाही...

बेळगाव : कर्नाटकातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्यांसाठी विलगिकरणाची सक्ती नसल्याचे राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या आयुक्तांनी १४ मे रोजी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात विलगिकरण प्रक्रियेबाबतची माहिती देण्यात आली आहे.

कर्नाटकातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्यांपैकी ज्यांच्यात कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत त्यांना विलगिकरण करण्याची गरज नाही असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. पण ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे आहेत त्यांच्यासाठी मात्र विलगिकरण प्रक्रिया सक्तीची आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर एका राज्यातून अन्य राज्यात तसेच एका जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परराज्यातून कर्नाटकात येणाऱ्यांना त्यातही रेड झोनमधून येणाऱ्यांना विलगिकरण सक्तीचे करण्यात आले आहे.आधी संस्थात्मक व त्यांनतर त्यांच्या स्वतःच्या घरात विलगिकरण केले जात आहे. त्यामुळे असे सर्वजण २८ दिवस कोणाच्याही संपर्कात येणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे.

हेही वाचा- याच्यामुळेच रत्नागिरीचे आले आरोग्य धोक्यात : कोण केला आरोप.... वाचा

नियमित  होणार आरोग्य तपासणी

 एका जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात जाणाऱ्यांनाही या विलगिकरणाची सक्ती केली जात आहे. त्याबाबत शासनाकडे तक्रारी दाखल झाल्या व विलगिकरण रद्द करण्याची मागणी झाली. विलगिकरणाबाबत २ मे रोजी राज्याच्या आरोग्य विभागाने एक आदेश बजावला होता. त्यात आता थोडी दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकात आंतर जिल्हा प्रवास करणार्यांना दिलासा मिळाला आहे. पण अन्य जिल्ह्यातून आलेल्यांवर आरोग्य विभागाचे लक्ष असणार आहे. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 decision of the department of health in belgaum