मधुमेही रुग्णांमध्ये कोविडचा मृत्युदर सर्वाधिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मधुमेही रुग्णांमध्ये कोविडचा मृत्युदर सर्वाधिक

सांगली : मधुमेही रुग्णांमध्ये कोविडचा मृत्युदर सर्वाधिक

सांगली : मधुमेहामध्ये संसर्गजन्य रोगांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे कोविड होण्याची शक्यता सामान्यांपेक्षा अधिक असते. तसेच कोविड गंभीर होण्याची शक्यता जास्त असते. मधुमेही रुग्णांमध्ये कोविडचा मृत्युदर सर्वाधिक आहे. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी घाबरून न जाता जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असे मत जिल्ह्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. आनंद मालाणी यांनी व्यक्त केले.

मधुमेह आणि कोविड यांचा परस्पर संबंध स्पष्ट करताना डॉ. मालाणी म्हणाले,‘‘कोविड हा आजार स्वत:च मधुमेह उत्पन्न करू शकतो. गंभीर कोविडमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळेसुद्धा मधुमेह उद्‌भवू शकतो. म्युकॉरमायकॉसिससारखा घातक रोग होण्याचे प्रमाणही जास्त आहे. अनेकदा शुगर लेव्हल अनियंत्रित असते. उपचार सांगितल्यानुसार न घेणे, स्वत:च डोस कमी जास्त करणे, इन्शुलिनची गरज असताना घेण्यास नकार देणे, अयोग्य आहार, पथ्य न पाळणे, व्यायामाचा अभाव आदी त्यामागील काही कारणे आहेत.’’

हेही वाचा: कोरोनानंतर मधुमेहींनी घ्या विशेष काळजी; म्युकरमायकॉसीसचे सर्वाधिक रुग्ण मधुमेही

ते म्हणाले, ‘‘मधुमेह गंभीर कोविड होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि किडनी विकाराचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आजार गंभीर होण्याचे प्रमाण खूपच वाढते. एका शास्त्रीय अहवालानुसार तर मधुमेहामध्ये कोविडचा मृत्युदर १४.४ टक्के आहे. या अभ्यासामध्ये एकूण १६,३९१ कोविड रुग्णांचा अभ्यास केला गेला. त्यापैकी १३६५ रुग्णांना मधुमेह होता. ज्यापैकी १९६ रुग्णांचा मृत्यू झाला. तर उर्वरित १५,०२८ रुग्णांपैकी फक्त ४९५ जणांचा मृत्यू झाला. म्हणजे हे प्रमाण ३.३ टक्के होते. म्हणजेच मधुमेही रुग्णांमध्ये कोविडमुळे मृत्यू होण्याची शक्यता इतर रुग्णांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.’’

कोविड १९ ची लक्षणे ताप, थंडी, डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी, घशात दुखणे, खवखवणे, वास व चव याची जाणीव न होणे आदी आहेत; मात्र ही सर्व लक्षणे मधुमेहामध्ये तीव्र स्वरूपाची असू शकतात.

हेही वाचा: मुंबई : अंधेरीत कोविडचा विळखा कायम सर्वाधिक इमारती आणि मजले सील

कोविडमध्ये मधुमेहाचे उपचार करताना नेहमीचे उपचार चालू ठेवावेत. मध्यम तीव्र स्वरुपाचा आजार असल्यास बहुतांश रुग्ण ॲडमिट असतात. स्टिरॉइड्‌स चालू असतात. त्यामुळे इन्शुलिनला पर्याय नसतो. गंभीर कोविडमध्ये मधुमेह नियंत्रित असणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे इन्शुलिनला नकार देणे चुकीचे आहे, असेही डॉ. मालाणी यांनी सांगितले.

कोविड संपलेला नाही...

कोविड-१९ अजूनही संपलेला नाही. सुदैवाने आपल्याकडील दुसरी लाट आता आटोक्यात आहे. सध्या पूर्ण भारतात दहा हजारच्या आसपास, महाराष्ट्रात एक हजार व सांगलीत दहाच्या जवळपास रोजची रुग्णसंख्या आहे. पण कोविड आता जवळपास नष्ट झाला आहे, या समजुतीने रुग्ण तपासणी करण्यासाठी तयार होत नाहीत. त्यामुळे हा आकडा फसवा असू शकतो. तिसऱ्या लाटेविषयी कुणीही ठामपणे भाकित करू शकत नाही. अनेक देशांमध्ये लसीकरण होऊनही तिसरी व चौथी लाट सुरू आहे. त्यामुळे आपल्यालाही जागरूक राहायला हवे, असे आवाहन डॉ. मालाणी यांनी केले आहे.

loading image
go to top