लालपरी गावात येताच ग्रामस्थांनी घातला गराडा पण...

विजय लोहार
Tuesday, 1 September 2020

एस टीचे चाक सद्या मालवाहतूकीच्या व्हेंटिलेटरवर आहे.

नेर्ले (सांगली) : 'गच्च माणसं भरून येणाऱ्या  लालपरी चं गावात आगमन झालं,आणि गावकऱ्यांनी तोंडात बोटं घातली लालपरीच होती, पण माणसं भरलेली न्हवे तर तांदळाची पोती भरलेली लालपरी. कोरोनाची महामारी सुरू झाली आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचं आभाळच फाटलं.कुणी आत्महत्या केली तर कोण धाय मोकलून  रडलं. तर कुणी एस टी च्या पुढ्यात लोटांगण घातलं.  कित्येक हसती खेळती कुटुंब गप गार झाली.

आज नेर्ले येथील धान्य व्यापारी यांचेकडे तांदळाची मालवाहतूक करण्यासाठी कोल्हापूरहून लालपरी गावातील मुख्य चौकात उभी होती.काही ग्रामस्थांनी एसटी पाहण्याची गर्दी केली.मालवाहतूकी साठी आलेली बस पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. नेर्ले येथे गाडी भरून ती कुडाळ व्हाया सिंधुदुर्ग येथे रवाना झाली.चालक अजित भोईटे गाव दिंडेवाडी ता भुदरगड जिल्हा कोल्हापूर हे गाडी घेऊन आले होते.जरी शासनाने एस टी चालू केली असली तरी सगळ्याच चालक व वाहकांना सद्या ड्युटी मिळालेली नाही.अनेकांचे पगार थकीत आहेत. तर नवीन भरती केलेल्या चालक वाहकांची नोकरी राहते की जाते?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा- चिनी ॲपला बंदी मात्र भारतीय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात या अडचणी

एकूणच कोरोना झालेल्या माणसाला ऑक्सिजन कमी पडला तर त्याला व्हेंटिलेटर ची गरज भासते.इथे लालपरी ने व्हेंटिलेटर म्हणून जरी मालवाहतूक केली तरी हा प्रश्न न मिटणारा आहे.जोपर्यंत लालपरीची चाके पूर्ववत सुरू होत नाहीत तोपर्यंत अनेक चालक वाहक,कर्मचारी यांची कुटुंबे देखील आर्थिक व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत आहेत.त्यांचा प्रश्न सुटायला हवा.
गावोगावी व्यापारी यांच्याशी संपर्क करून लालपरी मालवाहतूकीच्या व्हेंटिलेटरवर जगण्याचा प्रयत्न करीत आहे.

संपादन -  अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid impact village bus again ST is currently on the covid 19 freight ventilator