पतसंस्था बुडाल्या... सावकार तरले

Money
Money

सांगली जिल्ह्यात पाच वर्षांत 120 संस्था बंद, 170 सावकार वाढले
सांगली - सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात पंधरा वर्षांपूर्वी दहा हजार पतसंस्थांचे जाळे पसरले होते. आजमितीला केवळ 887 पतसंस्था तग धरून आहेत. त्यातील बोटावर मोजण्याइतपत आदर्शवत कामकाज चालवत आहेत, तर दुसरीकडे खासगी सावकारी मात्र वाढल्याचे धक्कादायक चित्र समोर येते. पाच वर्षांत 120 पतसंस्था बंद केल्या गेल्या. याच काळात 170 खासगी सावकार वाढले. सध्या 578 परवानाधारक सावकार आहेत. बेकायदा सावकारीही जोमात आहे. पतपुरवठा करणाऱ्या संस्थांपेक्षा सावकारांची संख्या जास्त आहे.

सहकारी पतसंस्था, शेती पतपुरवठा संस्था, सहकारी दूध संस्थांचे जाळे जिल्हाभर विणले होते. गरिबांना अडीअडचणीच्या काळात याच संस्था मदतीला धावून जात होत्या. पतसंस्थांच्या एकापाठोपाठ एक शाखा निघाल्या. काहींची उलाढाल तर बॅंकांपेक्षा वाढली. 20 ते 25 वर्षांपूर्वी सहकार क्षेत्राचा सर्वत्र दबदबा होता. त्यामुळे खासगी फायनान्स कंपन्या किंवा बॅंकांना शिरकाव करण्यास वाव नव्हता.

सहकारी संस्थांना चांगले दिवस आले असतानाच संस्थाचालकांना हाव सुटली. विनातारण कर्जे वाटली, नातेवाइकांच्या नावांवर स्वत: पैसे उचलले, थकबाकीचे प्रमाण वाढले. अनेक संस्थांना ही कीड लागली.

एकेक संस्था अडचणीत आल्या. ठेवीदारांचा विश्‍वास उडाला. संस्थांना टाळे लागले. कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या. कोर्टात केसेस दाखल झाल्या. अनेक संस्था बंद कराव्या लागल्या. शेकडो संस्था अवसायनात निघाल्या, प्रशासक आले. गैरव्यवहाराची मालिकाच सुरू झाली.

पतसंस्था बंद पडण्याचा सिलसिला असताना आठशेहून अधिक संस्था तग धरून आहेत. काही संस्थांनी वादळात दिवा लावून आजच्या काळातही आदर्शवत चालवू शकतो हे दाखवून दिले. बोटावर मोजण्याइतपत संस्था नफ्यात आहेत. एकीकडे पतसंस्थांना टाळे लागत असताना दुसरीकडे खासगी सावकारांच्या पेढ्यातून उलाढाल वाढली आहे. अधिकृत अनेक सावकार बेकायदा सावकारी करू लागले आहेत.

महिना तीन ते पाच टक्के दराने व्याजाने ते कर्जे देत आहेत. व्याजावर व्याज चढवून मुद्दल कायम ठेवले जाते. त्यातूनच कर्जदारांची मालमत्ता हडप केली जाते.

सावकारीचे चित्र -
मिरज-262, कवठेमहांकाळ-28, जत-25, तासगाव-21, कडेगाव-17, विटा-97, पलूस-23, वाळवा-63, शिराळा-27, आटपाडी-15 याप्रमाणे जिल्ह्यात 578 सावकारांकडे परवाना आहे. त्याहून अधिक बेकायदा सावकार आहेत. दोन्ही सावकारांची बेरीज केली तर पतपुरवठा करणाऱ्या संस्थांपेक्षा त्यांची संख्या जास्त आहे.

पतसंस्थांचे चित्र -
मिरज-259, कवठेमहांकाळ-56, जत-65, तासगाव-46, कडेगाव-29, विटा-43, पलूस-78, वाळवा-218, शिराळा-58, आटपाडी-35 याप्रमाणे सद्य:स्थितीत जिल्ह्यात 887 पतपुरवठा संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक संस्थांकडून पतपुरवठाही केला जात नाही.

जिल्ह्याचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे. जिल्ह्यातील पतसंस्थांची स्थिती काय आहे, याची माहिती घेतली जाईल. अडचणींवर मार्ग काढण्यासाठी सहा निबंधकांच्या उपस्थितीत 11 सप्टेंबर रोजी बैठक घेणार आहे.
- नीळकंठ करे, जिल्हा सहकार उपनिबंधक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com