क्रिकेट स्पर्धा : सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विजेता

Cricket Competition Winner of Solapur Area Development Authority
Cricket Competition Winner of Solapur Area Development Authority

सोलापूर : सोलापूरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाच्या संघानेच विजेतेपद पटकाविले, तर उपविजेता कोल्हापूरचा संघ ठरला आहे. जलसंपदा विकासचे सचिव सु. वि. सोडल यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. नियमितपणे व्यायाम व खेळ या गोष्टींना प्राधान्य देऊन सोपविलेली कामे प्रभावीपणे करावीत व खिलाडूवृत्ती कायम बाळगावी, असे अभियंता च. अ. बिराजदार यांनी सांगितले. 

जलसंपदा विभागांतर्गत असणाऱ्या विविध क्षेत्रीय कार्यालये व महामंडळस्तरीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक क्षमतेत विकास होऊन कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांचे आयोजन डिसेंबर महिन्यात प्रत्येक पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत असणाऱ्या मंडळ कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या सहभागातून केले जाते. प्रत्येक महामंडळातील विजयी व निवडक खेळाडूंचा समावेश असलेला संघ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सहभागी होतो. 

अटीतटीच्या अंतिम सामन्यात लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूरच्या संघाने कोल्हापूर पाटबंधारे मंडळ क्रिकेट संघावर विजय मिळवून तिसऱ्यांदा क्रिकेट ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विजेत्यांना जलसंपदा विभागाचे सचिव अभियंता च. अ. बिराजदार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये सातारा पाटबंधारे मंडळ व कोल्हापूर पाटबंधारे मंडळ यांच्यात लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर संघाने 10 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 122 धावा केल्या. प्रत्युत्तरात सातारा संघाने सहा गडी गमावून केवळ 88 धावा केल्या. हा सामना कोल्हापूर संघाने 34 धावांनी जिंकला. दुसऱ्या उपांत्य सामना लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर व पुणे पाटबंधारे मंडळ यांच्यात झाला. पुणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सोलापूर संघाने फलंदाजी करताना 10 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 112 धावा केल्या. प्रत्युत्तरात पुणे संघाने सहा गडी गमावून केवळ 85 धावा केल्या. हा सामना सोलापूर संघाने 27 धावांनी जिंकला. अंतिम सामना सोलापूर व कोल्हापूर संघात झाला. या सामन्यासाठी उपस्थित असलेले कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बांदिवडेकर यांनी सामन्याची नाणेफेक केली. सोलापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत रवी घाडगेच्या 14 चेंडूत सहा षटकारांसह 41 धावांच्या साथीने 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोल्हापूर संघाने 10 षटकांत 119 धावा केल्या. महेश चाचेने 74 धावांची नाबाद खेळी केली; पण हा सामना सोलापूरने आठ धावांनी जिंकून तिसऱ्या वेळेस चषकावर आपले नाव कोरले. 

तीन महिला क्रिकेट संघ सहभागी 
स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या तीन महिला क्रिकेट संघांदरम्यान सामने खेळविण्यात आले. यातील पहिला सामना सोलापूर महिला संघ व कोल्हापूर महिला संघादरम्यान खेळविण्यात आला. यामध्ये सोलापूर महिला संघाने विजय संपादन केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापूर व सांगली महिला संघादरम्यान सामना खेळविण्यात आला. यामध्ये कोल्हापूर संघ विजयी ठरला. त्यानंतर अंतिम सामना सोलापूर व कोल्हापूर महिला संघादरम्यान खेळविण्यात आला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना सहा षटकांत कोल्हापूर संघाने पाच गडी बाद 26 धावा केल्या. सोलापूर संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 4.2 षटकांतच लक्ष्य पार करून चषकावर नाव कोरले. सोलापूर महिला संघ हा सलग तीन वर्षे उपविजेता ठरलेला होता. या वर्षी त्यांनी पराभवाचा वचपा काढत विजेतेपदावर मोहोर उमटविली. 

बक्षीस वितरण सोहळा 
बक्षीस वितरण सोहळ्यास सोलापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय कोंडेकर, भीमा विकास विभाग क्रमांक दोन, सोलापूर विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश क्षीरसागर, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाचे सहायक अधीक्षक अभियंता सतीश भोसले, कोल्हापूर मंडळाच्या सहायक अधीक्षक अभियंता पूनम जाधव, ओमप्रकाश थंबद, प्रकाश बाबा, संध्या अलझेंडे व इतर उपविभागीय अभियंता, अधिकारी आदी उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन संतोष अडाकूळ यांनी केले. सचिन देसाई यांनी आभार मानले. अंतिम सामन्यातील विजेत्या व उपविजेत्या संघांच्या सर्व महिला व पुरुष खेळाडूंना सहायक अधीक्षक अभियंता सतीश भोसले यांच्यातर्फे फेटे बांधून व प्रत्येकास सोलापुरी टॉवेल देऊन सन्मान करण्यात आला. 

अधीक्षक अभियंता धी. बा. साळे, राजीव साळुंखे, राजेंद्र जगताप, नागनाथ कोळी, शंकर होटकर, सुधीर नाईक-निंबाळकर, प्रमोद मैलारी, प्रदीप टकले, कैलास चौधरी, समीर पाटील, रमाकांत रणदिवे, विनायक पाटील, शहानूर शेख, अरुण राजगुरू, श्री. सारणे, श्री. माळी, सचिन रजपूत व श्री. जमादार यांनी परिश्रम घेतले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com