#Solapur : ठरलं... नो व्हेईकल झोनचा आदेश रद्द!

#Solapur : ठरलं... नो व्हेईकल झोनचा आदेश रद्द!

सोलापूर : नवी पेठेतील वाहतुकीच्या कोंडीवर उपाय म्हणून लागू केलेला नो व्हेईकल झोनचा आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शनिवारी रद्द केला. शुक्रवारी रात्रीच नवी पेठ परिसरातील सर्व रस्त्यावरील बॅरिकेड काढण्यात आले. व्यापाऱ्यांची बैठक घेऊन पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. 

व्यापाऱ्यांनी केला होता विरोध
पोलिसांनी सोमवार, ता. 16 डिसेंबरपासून नवी पेठ परिसरात नो व्हेईकल झोनचा आदेश लागू केला होता. बाजारपेठेत जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर बॅरिकेड लावण्यात आले होते. पहिल्या दिवसापासून नो व्हेईकल झोनला व्यापाऱ्यांनी विरोध केला. नो व्हेईकल झोनमुळे व्यापाऱ्यांसोबतच ग्राहकांना त्रास होत असल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी सांगितलेली पार्किंगची ठिकाणे सोयीची नाहीत, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. व्यापाऱ्यांनी शुक्रवारी शिवस्मारक सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला व्यापाऱ्यांसोबत सर्व पक्षीय नेते आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला होता. 

बॅरिकेड काढण्यात आले
व्यापाऱ्यांच्या या भूमिकेनंतर शुक्रवारी रात्रीच नवी पेठेतील सर्व रस्त्यांवरील बॅरिकेड काढण्यात आले. शनिवारी सकाळी तत्काळ व्यापाऱ्यांना बोलावून नो व्हेईकल झोनचा आदेश रद्द केल्याची माहिती पोलिस आयुक्त शिंदे यांनी दिली. या वेळी नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक, शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास करली, व्यापारी असोसिएशनचे खुशाल देढीया, माणिक गोयल, मोहन बारड, गुलाब बारड, श्रीकांत घाडगे, विजय पुकाळे आदी उपस्थित होते. 

पोलिसांची सकारात्मक भूमिका
नो व्हेईकल झोनच्या निमित्ताने पोलिस आणि व्यापाऱ्यांत कोणत्याही प्रकारचा राग, द्वेष निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांच्या हितासाठीच हा निर्णय घेतला होता. ग्राहक, नागरिक तसेच राजकीय लोकांकडून वाढता विरोध पाहता पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेत नो व्हेईकल झोनचा आदेश रद्द करून वाहनांसाठी नवी पेठ मोकळी केली आहे. 

नवी पेठेतील व्यापाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार, सूचनेनुसारच नो व्हेईकल झोनचा आदेश लागू केला होता. बाजारपेठेतील वाहनांच्या गर्दीमुळे ग्राहकांना, व्यापाऱ्यांना त्रास कमी व्हावा म्हणून आपण प्रायोगिक तत्त्वावर नो व्हेईकल झोनचा निर्णय घेतला होता. बाजारपेठ परिसरात बॅरिकेड लावल्यामुळे ग्राहकांवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. व्यापाऱ्यांचा विरोध पाहता प्रायोगिक तत्त्वावरील नो व्हेईकल झोनचा आदेश रद्द करण्यात येत आहे. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्त 

 
पोलिस प्रशासनाकडून आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. व्यापाऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत पोलिस आयुक्तांनी नवी पेठेतील नो व्हेईकल झोन संदर्भातील आदेश रद्द केला आहे. नवी पेठ परिसरातील सर्व रस्ते मोकळे झाल्याने व्यापारी, ग्राहक आनंदीत आहेत. आता सर्व सोलापूरकरांनी निर्भयपणे खरेदीसाठी यावे. पोलिस प्रशासनाला भविष्यातही आमचे सहकार्य असणार आहे. 
- अशोक मुळीक, 
अध्यक्ष, नवी पेठ व्यापारी असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com