सांगलीचे माजी महापौर हारूण शिकलगार यांच्यावर गुन्हा; पोलिसांना केली दमदाटी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 July 2020

काल रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी हवालदार संतोष कुडचे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सांगली ः शहर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी माजी महापौर व विद्यमान नगरसेवक हारूण शिकलगार यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काल रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी हवालदार संतोष कुडचे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरी भागात लॉकडाउन करण्यात आले आहे. सायंकाळी सातनंतर संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. येथील स्टेशन चौकात शहर शिकलगार हे वाद घालत होते. त्याच परिसरातून जाणाऱ्या पोलिसांनी त्यांना "संचारबंदी आहे, घरी जा' असे सांगितले. त्यानंतर शिकलगार यांनी त्यांच्याशी वाद घालत थेट शहर पोलिस ठाणे गाठले. त्याठिकाणी आरडाओरडा करत गोंधळ घातला. तेथील पोलिसांनी शिवीगाळ करत दमदाटीही केली. निरीक्षक अजय सिंदकर यांच्याशीही त्यांनी वाद घातला. त्यानंतर पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार हारूण शिकलगार यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

संपादन ः शैलेश पेटकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against former mayor Harun Shikalgar