आमदार सुरेशअण्णा ऊसतोड कामगारांच्या मदतीला धावले अन पोलिसांच्या कचाट्यात घावले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

आष्टीसह पाटोदा, गेवराई तालुक्‍यातील खलाटवाडी, तिंतरवणी, नागतळा, पाटसरा, यांसह विविध भागांतील मजूर विविध ठिकाणी ऊसतोडीसाठी गेले होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे मजूर ट्रॅक्‍टरमधून गावी निघाले होते. मात्र, त्यांना खेड (ता. कर्जत) येथे बुधवारी (ता. एक) भिगवण पोलिसांनी अडविले. या वेळी पोलिसांनी मारहाणही केल्याचा आरोप काही मजुरांनी केला होता.

नगर: जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध आष्टी (बीड) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आष्टी पोलिस ठाण्यातील नाईक प्रशांत क्षीरसागर यांनी काल (गुरुवारी) रात्री आठ वाजता फिर्याद दिली. 

अधिक माहिती अशी : आष्टीसह पाटोदा, गेवराई तालुक्‍यातील खलाटवाडी, तिंतरवणी, नागतळा, पाटसरा, यांसह विविध भागांतील मजूर विविध ठिकाणी ऊसतोडीसाठी गेले होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे मजूर ट्रॅक्‍टरमधून गावी निघाले होते. मात्र, त्यांना खेड (ता. कर्जत) येथे बुधवारी (ता. एक) भिगवण पोलिसांनी अडविले.

या वेळी पोलिसांनी मारहाणही केल्याचा आरोप काही मजुरांनी केला होता. या संदर्भात माहिती मिळताच आमदार धस आष्टीतून खेड (ता. कर्जत, जि. नगर) येथे पोचले. जिल्हाबंदीचा आदेश धुडकावून आमदार धस नगर जिल्ह्यात आले.

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध काल सीमाबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक अमित करपे तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against MLA Suresh Dhas