प्रेमापोटी भाबड्या आईने घर केले नावे पण पोटचा गोळाच निघाला वरवंटा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 February 2021

पुन्हा चांगली देखभाल करण्याचे सांगून भलावण केले. मुलावर विश्‍वास ठेवून आईने खटला मागे घेतला.

बेळगाव : वृद्ध मातेचे पालनपोषण करण्याचे आमीष दाखवून तिच्या नावावरील घर आपल्या नावे करुन घेऊन मुलाने आईची छळवणूक चालविली आहे. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्याने मातेसह भावोजीला अर्वाच्च शिवीगाळ करुन मारहाण केली. सोमवारी (ता. ८) देवांगनगर, वडगावमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी संशयित श्रवण उत्तमदास हिरेमणी (रा. सपार गल्ली, वडगाव) याच्याविरोधात शहापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विजयालक्ष्मी उत्तमदास हिरेमणी (वय ७३, रा. देवांगनगर, दुसरा क्रॉस वडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, २०१४ मध्ये श्रवणने देवांगनगरमधील आईच्या घरी जाऊन तुझ्या नावे असलेले घर माझ्या नावे करण्याची मागणी केली. त्यानुसार विजयालक्ष्मी यांनी घर मुलाच्या नावे केले. यानंतर श्रवणने हे घर पत्नी वैशालीच्या नावावर केले. तसेच आईची व्यवस्थित देखभाल न करता छळवणूक सुरु केली. यामुळे विजयालक्ष्मी यांनी मार्च २०१४ मध्ये याविरोधात खटला दाखल केला. त्यावेळी श्रवणने आई विजयालक्ष्मी यांच्याकडे जाऊन खटला मागे घेण्याची विनंती केली. तसेच पुन्हा चांगली देखभाल करण्याचे सांगून भलावण केले. मुलावर विश्‍वास ठेवून आईने खटला मागे घेतला.

हेही वाचा - Success Story : व्हायचं होतं कार्डिओलॉजिस्ट पण झाली सीए ; देशात प्रथम आलेल्या निधीचा प्रेरणादायी प्रवास

मात्र, श्रवणने पुन्हा सतावणूक सुरु केल्याने त्यांनी नोव्हेंबर २०२० पुन्हा खटला दाखल केला. याची सुनावणी सोमवारी (ता. ८) झाली. त्याच दिवशी विजयालक्ष्मी या मुलगी कांचन आणि जावई मोहनकुमार यांच्यासोबत घरात असताना संशयित श्रवणने घर आपले असल्याचे सांगत कुलूप घालण्याचा प्रयत्न केला. यावरुन संशयित व जावई मोहनकुमार यांच्या वाद होऊन हाणामारी झाली. याप्रकरणी विजयालक्ष्मी यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दाखल केली. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime case son arrested by police he bullying mother in belgaum