नातेवाइकांच्या आक्रोशाने डोळे पाणावले; 2 बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नातेवाइकांच्या आक्रोशाने डोळे पाणावले; 2 बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नातेवाइकांच्या आक्रोशाने डोळे पाणावले; 2 बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

विसापूर : आरवडे (ता. तासगाव) येथील दोन लहान बालकांचा (child dead) शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. काळजाला पिळवटून टाकणारी ही घटना बुधवारी संध्याकाळी आरवडे ते गोटेवाडी रस्तालगत असलेल्या मस्के वस्ती येथे घडली. शौर्य संजय मस्के (वय ६) व ऐश्वर्या आप्पासो आवटी (वय-८, रा. माधवनगर) अशी मृत बालकांची नावे आहेत. बालकांच्या नातेवाइकांच्या आक्रोशामुळे उपस्थितांचे ही डोळे पाणावले. (crimecase)

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की आरवडे ते गोटेवाडी रस्त्यादरम्यान मस्के वस्ती येथे संजय मस्के राहतात. त्यांना शौर्य हा एकुलता एक मुलगा आहे. काल सायंकाळी शौर्य व त्यांच्या नात्यातील मुलगी ऐश्‍वर्या खेळत होते, मात्र बराच वेळ झाल्यानंतर ही दोन्ही मुले कुठे दिसत नसल्याने कुटुंबीयातील सर्वांनी या बालकांची शोधाशोध सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाच काही जणांचे घराच्या पाठीमागे असलेल्या शेततळ्याकडे लक्ष गेले. शेततळ्याच्या कडेलाच मोबाईल पडला होता.

यावरून काही तरुणांनी शेततळ्यात शोधमोहीम सुरू केली. यावेळी तळाला ही दोन बालके दिसली. बालकांना तातडीने तासगाव येथे दवाखान्यात घेऊन गेले, मात्र डॉक्टरांनी दोन्ही बालकांना मृत घोषित केले. संजय मस्के यांना शौर्य हा एकुलता एक मुलगा होता, तर ऐश्वर्याला दोन लहान भाऊ आहेत. माधवनगर येथून ऐश्‍वर्या काही दिवसांसाठी येथील नातेवाइकांकडे आली होती. या दोन्ही बालकांचे मृतदेह पाहिल्यानंतर त्यांच्या आईने व नातेवाइकांनी अक्षरशा हंबरडा फोडला.

आरोग्य विभागाची तत्परता

या घटनेनंतर दोन्ही मुलांच्या नातेवाइकांना प्रचंड धक्का बसला होता. चक्कर येणे, बेशुद्ध पडणे असे प्रकार घडू लागलेत. त्यामुळे नातेवाइकांनी लगेच येथील उपकेंद्रात असणारे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रोहित जाधव, तसेच आरोग्य सेविका भाग्यश्री माळी, अंशकालीन स्त्रीपरिचर रंजना मोरे यांना बोलावले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. जाधव यांनी रुग्णवाहिकाचालक संतोष कारंडे यांनाही बोलावून घेतले. रात्री साडेदहापर्यंत नातेवाइकांवर लक्ष ठेवत उपचार केले. आरोग्य विभागाची तत्परता आणि सतर्कता पाहून ग्रामस्थांनी सर्वांचे कौतुक केले.

शेततळ्याजवळ मोबाईल

बालके दिसेनाशी झाल्यावर मस्के कुटुंबीयांनी जोरदार शोधमोहीम राबवली. परिसरातील घरे, आजूबाजूला वस्तीवर चौकशी केली, मात्र ते दिसेनात. शोधमोहीम सुरू असतानाच काही जणांचे लक्ष शेततळ्याकडे गेले, शेततळ्याच्या कडेलाच मोबाईल पडलेला दिसला. यानंतर मात्र संशयाची पाल चुकचुकली, काही तरुणांनी तळ्यात शोध घेतला. यावेळी बालके तळाला सापडली.

टॅग्स :Sangli