ब्रेकिंग ; सांगलीत हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय अड्डा छाप्यात पोलिस निरीक्षकालाच बेड्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 January 2021

सांगली-  लेडीज सर्व्हीस बारमुळे काही वर्षापूर्वी चर्चेत आलेल्या हॉटेल रणवीरमध्ये चोरीछुपे सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्‍या अड्डावर पोलिसांनी गुरूवारी रात्री छापा टाकला. या छाप्यावेळी वेश्‍यागमनासाठी आलेले आटपाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरूण रामचंद्र देवकर यांच्यासह सहाजणांना अटक केली. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे. 

सांगली-  लेडीज सर्व्हीस बारमुळे काही वर्षापूर्वी चर्चेत आलेल्या हॉटेल रणवीरमध्ये चोरीछुपे सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्‍या अड्डावर पोलिसांनी गुरूवारी रात्री छापा टाकला. या छाप्यावेळी वेश्‍यागमनासाठी आलेले आटपाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरूण रामचंद्र देवकर यांच्यासह सहाजणांना अटक केली. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ग्राहक म्हणून आलेले निरीक्षक अरूण देवकर (सध्या रा. आटपाडी), त्यांचे मित्र सत्यजित दिगंबर पंडित (रा. ब्राह्मणपुरी, मिरज), हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, शेट्टीचा भाऊ रविंद्र ऊर्फ रविअण्णा कोरागा शेट्टी, व्यवस्थापक राजेश यादव, दलाल शिवाजी नारायण गोंधळे ऊर्फ वाघळे (रा. सिद्धेश्‍वर कॉलनी, तासगाव) या सहाजणांना अटक केली त्यांच्याविरूद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मायादेवी काळगावे यांनी याबाबत फिर्याद दिली. या छाप्यात वेश्‍या व्यवसायासाठी हैद्राबाद व बंगाल व्हाया मुंबईमार्गे हॉटेल रणवीरमध्ये आणलेल्या दोन तरूणींची सुटका करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सांगली शहराबाहेर कर्नाळ रस्त्यावर असलेल्या हॉटेल रणवीरमध्ये हॉटेल मालक शेट्टीबंधूंनी हाय प्रोफाईल वेशा अड्डाच सुरू केला होता. त्यासाठी मुळच्या हैद्राबाद व बंगालमधील आणि सध्या मुंबईत असलेल्या दोन तरूणींना वेश्‍या व्यवसायासाठी आणून ठेवले होते. काही दिवसापासून हॉटेलमध्ये चोरीछुपे वेश्‍या व्यवसाय सुरू होता. शहरापासून काही अंतरावर असलेल्या या वेश्‍या अड्डयाची सांगली ग्रामीण पोलिसांना चाहूलच नव्हती. हॉटेलमधील व्यवस्थापक राजेश यादव हा दलाल शिवाजी गोंधळेकडून ग्राहक आल्यानंतर त्यांना पैसे घेऊन वेश्‍या पुरवत होता. दलाल गोंधळे हा एका ग्राहकाकडून तीन हजार रूपये घेत होता. त्यातील एक हजार स्वत:ला, एक हजार व्यवस्थापकाला आणि एक हजार रूपये तरूणीला देत होता. दोन तरूणींना जबरदस्तीने वेश्‍या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्या कमाईवर सर्वजण उपजिविका करत होते. 

हॉटेल रणवीरमधील या वेश्‍या अड्डयाबाबत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास सापळा रचला. त्यानंतर पोलिस पथकासह छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमधील रूम नंबर 107 व 105 मध्ये तपासणी केली. तेव्हा 105 मध्ये पोलिस निरीक्षक अरूण देवकर व सत्यजित पंडित वेश्‍या गमनासाठी आलेले आढळले. 

कारवाईवेळी निरीक्षक देवकर यांनी आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले. तत्काळ छापा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना छाप्यात पोलिस अधिकारी सापडल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पुढील कारवाईसाठी ग्रीन सिग्नल मिळाला. त्यामुळे देवकर व पंडित या दोन ग्राहकांसह हॉटेल मालक शेट्टीबंधू, व्यवस्थापक यादव, दलाल गोंधळे या सहाजणांना अटक करून सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. तेथे सहाय्यक निरीक्षक मायादेवी काळगावे यांनी फिर्याद दिली. 
 

पोलिस दलात खळबळ- 
कडेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक विपीन हसबनीस यांना काही दिवसापूर्वी तरूणावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यामुळे पोलिस दलाची बदनामी झाली होती. त्यानंतर आटपाडीचे निरीक्षक देवकर शंभर किलोमीटर दूरवर सांगलीत हॉटेलमध्ये वेश्‍या अड्डयावर सापडले. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 
 

हेही वाचा - खिशाला कात्री नको या मानसिकतेपोटी काहीजणांनी आतापासूनच सावध भूमिका घेतली आहे

 

संपादन -  घनश्‍याम नवाथे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime cases in sangli police inspector arrested in crime case