चुलत भावांचा जमिनीचा वाद पोचला पोलिस ठाण्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

त्यांना आज येथील जिल्हा सत्रन्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

इस्लामपूर (सांगली) - नरसिंहपूर (ता. वाळवा) येथे शेतजमिनीच्या वाटणीवरून सख्ख्या चुलत भावांच्या कुटुंबात झालेल्या भांडणावरून इस्लामपूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. दोन्ही गटांकडे तिघांना पोलिसांनी शनिवारी (ता. 23) अटक केली. त्यांना आज येथील जिल्हा सत्रन्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

सचिन मोहन कदम (वय 25), तानाजी विलास कदम (वय 45), शुभम तानाजी कदम (वय 19) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून दोघांनी एकमेकांविरूद्ध तक्रारी दिल्या आहेत. सचिन कदम आणि तानाजी विलास कदम यांनी फिर्यादी दिल्या आहेत. 

सचिन कदम यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की शनिवारी (ता.23) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तानाजी कदम, प्रमोद कदम, शुभम तानाजी कदम हे सर्वजण सचिनच्या घरासमोर आले. शेतांत वडिलांसोबत भांडण का केलेस म्हणून शिवीगाळ करू लागले. सचिनने आमचे आम्हाला वाटून द्या, अशी मागणी केली. तानाजी यांनी सचिनला शिवीगाळ करत, लाथा घालत "तुला आता जिवंत ठेवत नाही' अशी धमकी देत हातातील खुरप्याने सचिनवर वार केला. सचिनच्या डोक्‍याला व हाताला दुखापत झाली. भांडण सुरूच असताना सोडवण्यासाठी सचिनची आई भांडणे मध्ये गेली. तिलाही प्रमोदने जखमी केले. शुभमने लोखंडी सळीने सचिनच्या पाठीत मारहाण केली. 

तानाजी कदम याने फिर्यादीत म्हटले आहे, की शनिवारी (ता.23) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शेतात सचिनने वडिलांसोबत शिवीगाळ करून भांडण केले होते. रात्री आठ वाजता तानाजीने सचिनला घरी बोलावून घेतले. वडिलांसोबत भांडण का केले, दोघांच्यामधून बांधावरून वाट करू, असे समजून सांगत असताना सचिनने "मला, तुमच्या शेतातूनच वाट पाहिजे, तुम्हाला बघून घेतो' असे म्हणत निघून गेला. घरातून खुरपे घेऊन माघारी येऊन तानाजीच्या दोन्ही हातावर खुरप्याने मारहाण करून जखमी केले. प्रमोद भांडण सोडवण्यास आला असता त्यालाही हल्ला करून जखमी केले. इस्लामपूर पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश भरते तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime narsinhpur sangli district