Sangli Crime News : मिरजेत दारूचे गोदाम चोरट्यांनी फोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Thieves broke liquor godown in Miraj police arrest one accused  sangli

Sangli Crime News : मिरजेत दारूचे गोदाम चोरट्यांनी फोडले

मिरज : शहरातील गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत येथे गोदाम फोडून ३५ लाख ७४१ रुपयांची विदेशी दारू चोरट्यांनी चोरून नेली. ट्रकचालकाचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी बार्शी पोलिसांच्या मदतीने अवघ्या २४ तासांत या चोरीचा छडा लावला. याप्रकरणी रामा शंकर काळे (वय २०, कणेरवाडी, जि. उस्मानाबाद) याला बार्शी पोलिसांनी अटक केली, तर अन्य पाच पसार झाले आहेत. शहरातील गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत येथे रवा-मैदा कारखान्यासमोर एम्पायर स्पिरीट इंडिया नावाचे विदेशी दारूचे गोदाम आहे. येथून जिल्हाभरातील वॉईन शॉपसाठी दारूची विक्री होते. गुरुवारी सायंकाळी सहानंतर गोदाम बंद करण्यात आले होते.

त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गोदाम फोडून त्यामधील दारूचे ३४८ बॉक्स असा ३५ लाख ७४१ रुपयांचा दारूसाठा चोरून नेला होता. शुक्रवारी सकाळी गोदाम उघडण्यासाठी आले असता व्यवस्थापक विजय किसन निकम (४४, अभिमान ॲसेट, विश्रामबाग) यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली. दाखल फिर्यादीनुसार महात्मा गांधी चौकी पोलिसांनी तातडीने हालचाली करीत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये संशयित ट्रकचा क्रमांक पोलिसांना मिळाला. त्यावरून मूळ मालकाचा शोध घेण्यात आला. महात्मा गांधी चौक पोलिस व बार्शी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चोराच्या मुसक्या आवळल्या.

सहायक निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्यासह महात्मा गांधी चौक व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक तातडीने बार्शीला रवाना झाले होते. दरम्यान, यातील संशयित विभीषण काळे, पल्या काळे, अमोल काळे, चंदर काळे आणि सुभाष काळे या पाच जणांनी पलायन केले. रामा काळे हा मात्र बार्शी पोलिसांच्या तावडीत सापडला. रामा काळे याच्याकडे चौकशी करून ट्रकची तपासणी केल्यानंतर दारूचे बॉक्स मिळून आले. बार्शी पोलिसांनी ट्रकमधील ३५ लाख ७४१ रुपयांचा दारूसाठा आणि ९ लाखांचा ट्रक असा ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून रामा काळे याला अटक केली.