गुन्हेगार पलायन प्रकरण भोवले; गार्ड ड्युटीवरील चार पोलिस कर्मचाऱ्यांची बदली

शैलेश पेटकर
Wednesday, 30 September 2020

जिल्हा कारागृहासाठी येथील कॉलेज कॉर्नरजवळ उभारण्यात आलेल्या अलगीकरण कक्षातून दोघा गुन्हेगारांनी पलायन केले. याप्रकरणी अलगीकर कक्षात गार्ड ड्युटीवर असणाऱ्या चार पोलिसांची मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली.

सांगली : जिल्हा कारागृहासाठी येथील कॉलेज कॉर्नरजवळ उभारण्यात आलेल्या अलगीकरण कक्षातून दोघा गुन्हेगारांनी पलायन केले. याप्रकरणी अलगीकर कक्षात गार्ड ड्युटीवर असणाऱ्या चार पोलिसांची मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ही कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक अतुल निकम हे त्यांची चौकशी करणार आहेत. दरम्यान, गुन्हेगारांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. अद्याप शोध सुरू आहे. 

राजा ऊर्फ राजू नागेश कोळी (वय 20, हरीपूर काळीवाट, सांगली), नाग्या ऊर्फ नागेश ऊर्फ रोहित बाळू जगदाळे (वय 19, पोळ मळा, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) यांनी साथीदारांसह 23 ऑगस्ट रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास कोल्हापूर रस्ता परिसरात थांबलेल्या ट्रक चालकाला लुटले होते. शहर पोलिसांनी 17 सप्टेंबर रोजी दोघांनाही अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. कारागृहात नेण्यापूर्वी केलेल्या तपासणीत त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

त्यामुळे त्यांना कारागृहातील कैद्यांसाठी कॉलेज कॉर्नर येथे उभारलेल्या एका वसतीगृहातील अलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले. काल पहाटे खिडकीच्या काचा काढून, दोन गजांमधून ते बाहेर आले. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूच्या भिंतीवरून उड्या मारून त्यांनी पलायन केले.

याप्रकरणी गार्ड ड्युटीवर असलेल्या चार पोलिसांची तातडीने बदली करण्यात आली. त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, एलसीबीसह पाच पथके शोधासाठी रवाना करण्यात आले आहेत. रात्री उशीरापर्यंत पोलिसांच्या पळून गेलेले हाती लागले नव्हते.  

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal escape case; Transfer of four police personnel on guard duty