इस्लामपुरात पोलीस रेकॉर्डवरील 'त्या' गुन्हेगाराचा झाला खून...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

संतोष कदमला काल रविवारी (ता. 28) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सहा जणांनी बेदम मारहाण केली होती.

इस्लामपूर (सांगली) - किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून काल रात्री येथे निनाईनगरमध्ये संतोष कदम या पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून झाला आहे.  याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात अजित हणमंत पाटील, सुरज पांड्या, प्रतिक पाटील यांच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर मारेकरी पसार झाले असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

संतोष कदमवर काही महिन्यापुर्वी मोका अंतर्गत कारवाई झाली होती.सध्या जामिनावर तो बाहेर होता. काल रविवारी (ता. 28) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सहा जणांनी त्याला बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तो मृत झाला.

वाचा - धक्कादायक : आईचा मृत्यू झाल्याय, मग पुरावे द्या...

अजित पाटील आणि संतोष कदम या दोघांच्यात येथील बहे नाक्यावर किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यवसान भांडणात झाले. वादावादीनंतर घरी गेलेल्या अजित पाटीलने नंतर सोबत काहीजणांना घेऊन निनाईनगर येथे जाऊन संतोष कदमला बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या कदमवर उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminal on police record was murdered in Islampur