अतिवृष्टीमुळे पिक नुकसानीचा कृषी विभागाचा पंख्याखाली बसून अहवाल 

विष्णू मोहिते 
Thursday, 1 October 2020

जिल्ह्यात पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मिरज, खानापूर, पलूस, आटपाडी, वाळवा आणि तासगाव तालुक्‍यात खरीपासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सांगली : जिल्ह्यात पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मिरज, खानापूर, पलूस, आटपाडी, वाळवा आणि तासगाव तालुक्‍यात खरीपासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने 220 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल तयार केला आहे. या पंचनाम्यांविषयीच आता शंका उपस्थित होत आहे. पंख्याखाली बसून बनवण्यात आलेल्या या अहवालाविषयी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पाऊस झाला. आटपाडी, खानापूर, तासगाव आणि मिरज तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली आहे. आटपाडी तालुक्‍यात तर चार दिवसांत वर्षभराचा पाऊस पडला. दुष्काळग्रस्त पट्ट्यातील सर्व तालुक्‍यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. हा पाऊस पीक काढणीच्या वेळी झाला. मिरज तालुक्‍यातील कसबे डिग्रज, समडोळी, कर्नाळ, नांद्रे तसेच वाळवा तालुक्‍यात सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला पिकांत पाणी साचून आहे. पलूस, तासगाव आणि आटपाडी तालुक्‍यातील ज्वारी, भाजीपाला आणि बाजरी पिके अतिवृष्टीमुळे कुजण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने छाटणीही खोळंबली. 

अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान समोर दिसत असताना कृषी विभागाने मात्र जिल्ह्यात 220 हेक्‍टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार पंचनामे केले जाण्याची शक्‍यता आहे. आटपाडी तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे डाळिंबाचे फक्त शंभर हेक्‍टर नुकसान झाले असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. परंतु, तालुक्‍यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. डाळिंबाच्या बागांमध्ये पाच ते सहा दिवस पाणी साचून राहिले होते. त्यामुळे फळकूज होण्यास सुरवात झाली आहे. नदी आणि ओढ्याकाठी असलेल्या बागा पाण्याचा प्रवाहाने उन्मळून पडल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालाबाबत शंका उपस्थित होत आहेत.
 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop damage report due to heavy rains