सांगलीत भाजी मंडईत गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळा असे सतत आवाहन करुनही आज सकाळी भाजी, किराणा खरेदीसाठी शहरातील मंडईत नागरिकांनी गर्दी केलीच. काल पोलिसांनी गर्दी हटवण्यासाठी लाठीचा प्रसादही दिला होता. तरीही नागरिकांनी भान न ठेवता गर्दी करुन आपली असंवेदनशीलता दाखवली. 

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळा असे सतत आवाहन करुनही आज सकाळी भाजी, किराणा खरेदीसाठी शहरातील मंडईत नागरिकांनी गर्दी केलीच. काल पोलिसांनी गर्दी हटवण्यासाठी लाठीचा प्रसादही दिला होता. तरीही नागरिकांनी भान न ठेवता गर्दी करुन आपली असंवेदनशीलता दाखवली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज मंडई, पेठभागमधील महात्मा फुले भाजी मंडई येथे नागरिकांनी भाजी खरेदीसाठी गर्दी केली होती. सकाळच्या सुमारास सुमारास हजारभर सांगलीकर भाजी खरेदीसाठी आले होते. त्यातील अनेकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. गर्दी करुन संपर्क होऊ नये यासाठी प्रशासन सतत आवाहन करत आहे. मात्र त्याला कसलाही प्रतिसाद नागरिक देत नाहीत अशीच स्थिती मंडईतील गर्दीवरुन दिसत होते. 

महापालिकेने भाजी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करु नये यासाठी महापालिका क्षेत्रातील तीनही शहरात एकूण 18 भाजी विक्री केंद्रे सुरु केली आहेत. त्याचा लाभ घ्यावा. सकाळी सात ते अकरापर्यंत ही केंद्रे सुरु राहणार आहेत. त्यामुळे गर्दी करु नये असे आवाहनही केले आहे. परंतू त्यालाही हरताळ फासण्यात आला. शहर पोलिसांनी गर्दी हटवण्यासाठी काल लाठीमारही केला होता. तरीही आजची गर्दी पाहून नागरिकांना काहीच फरक पडत नाही असेच दिसून आले. 

किराणा खरेदीसाठीही गर्दी 
भाजी विक्रीबरोबरच किराणा दुकानही सकाळच्या सत्रात उघडी होती. तेथेही नागरिकांची बऱ्यापैकी गर्दी दिसून आली. जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. अनेकजण चार चाकी वाहने घेऊन खरेदीसाठी आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आता सुमारे महिनाभराचा किराणा भरुन घेण्याच्या तयारीनेच नागरिक दुकानांमध्ये गर्दी करत होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowded vegetable market in Sangli