कारखाना परिसरात अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे वॉटर एटीएमवर गर्दी 

घनश्‍याम नवाथे 
Thursday, 10 September 2020

शहर आणि परिसरात झालेल्या पावसाचा परिणाम म्हणून साखर कारखाना व परिसरात तीन दिवसापासून अशुद्ध पाणीपुरवठा होऊ लागला आहे.

सांगली : शहर आणि परिसरात झालेल्या पावसाचा परिणाम म्हणून साखर कारखाना व परिसरात तीन दिवसापासून अशुद्ध पाणीपुरवठा होऊ लागला आहे. नदी पात्रातील पाणी वाढ आणि माळ बंगला येथील जलशुद्धीकरणातील तांत्रिक अडचणीमुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत असून दोन-तीन दिवसात पाणी पुरवठा शुद्ध होईल असे सांगण्यात आले. परंतू सध्या किरकोळ आजार देखील धोकादायक असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएमसमोर गर्दी दिसू लागली आहे. 

सांगली परिसराला दोन-तीन दिवसापासून जोरदार पावसाने झोडपले आहे. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदीला जोडणारे ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी थोडीसी वाढली आहे. पावसानंतर वाहून आलेल्या पाण्यामुळे नदीतील पाणी गढूळ बनले आहे. पाणी वाढल्यामुळे माळ बंगला येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शुद्धीकरण प्रक्रिया नेहमीच्या वेगाने होत नाही. त्यामुळे अशुद्ध पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसापासून साखर कारखाना आणि संपूर्ण परिसराला होऊ लागला आहे. पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त नसले तरी अशुद्ध असून रंग बदललेला दिसतो. 

सध्या कोविड आपत्तीच्या काळात खासगी दवाखाने अनेक ठिकाणी बंद आहेत. किरकोळ आजारावर गोळ्या औषधे घेणे देखील अवघड बनले आहे. दवाखाने बंद असल्यामुळे अनेकजण थेट मेडिकल दुकानात जात आहेत. तसेच महापालिकेच्या दवाखान्यात देखील गर्दी होत आहे. किरकोळ आजारा अशावेळी अशुद्ध पाणी पिऊन आजारी पडण्याचा धोका पत्करण्यास कोणी तयार नाही. सध्या मिळणारे पाणी उकळून पिण्यायोग्य नाही. त्यामुळे आजारी पडण्यापेक्षा विकतचे पाणी आणलेले बरे म्हणून वॉटर एटीएमसमोर गर्दी दिसत आहे. वॉटर एटीएममधून पाच आणि दहा रूपयाला 20 लीटर पाणी विकत मिळते. दोन-तीन दिवसात शुद्ध पाणीपुरवठा होईल असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds at water ATMs due to unclean water supply