सांस्कृतिक चळवळीला हवे पोषक वातावरण

धनंजय गाडगीळ - dvg२९०४@gmail.com
मंगळवार, 17 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

सांस्कृतिक आणि मनोरंजन

नाट्यपंढरी म्हणून सांगलीची ओळख. येथील रंगभूमीवर अनेक दिग्गजांच्या नाटकाचा श्रीगणेशा झाला; पण, आता हे केवळ इतिहासातील दाखले देण्यापुरतेच राहिले  आहेत. कारण येथली सांस्कृतिक चळवळ मोडकळीस आली आहे. त्याला बरीच कारणं आहेत. त्या प्रमुख्याने नव्या पिढीशी नाटक जोडता आलं नाही, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने नाट्यगृहांची झालेली दुरवस्था. अशी अनेक कारणं आहेत. आजच्या काळात सांस्कृतिक चळवळीला पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
 

नाटकाची जन्मभूमी म्हणून सांगली परिचित आहे. इथं अनेक नाटक गाजली किंबहुना त्यांचा प्रारंभही झाला. बाल गंधर्व, विष्णूदास भावे यांच्यासह अनेकांची नावं घ्यावी लागतील; मात्र गेल्या काही वर्षांत येथील नाट्यचळवळ मोडकळीस आली आहे. हाऊसफुल्ल असणारी थिएटर ओस पडू लागली आहेत. बाहेरील कलाकार इथं यायला तयार नाहीत. मग, आमची नाट्यपंढरी म्हणून मिरवायचे का? हा प्रश्‍न आमच्यासारख्या अनेक नाट्यवेड्यांना पडतो. 

गेल्या काही वर्षांत नाटक पाहणारा प्रेक्षक कमी झाला आहे. बालगंधर्वांच्या काळातलं जरी नाटक काढलं तरी पहिल्या आठ रांगातला प्रेक्षक कायमच असतोच, पण मागील रांगांचा प्रश्‍न आहे. नाटक नव्या पिढीशी जोडली गेली नाहीत. ही जोडण्यासाठी माध्यमांची जबाबदारी  मोठी आहे. नाटक म्हणजे काय हे रुजवण्याची गरज या काळात निर्माण झाली आहे. पूर्वी राज्यात प्रथमच सांगलीने ‘संस्कार भारती नाट्य संवाद’ योजना सुरू केली. या वार्षिक सभासद योजनेमुळे वर्षात सहा नाटक प्रेक्षकांना पहायला मिळायची. मात्र आताच्या काळात तोट्यात चालणारी ही योजना बंद पडली हे दुःखदायक आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे सांगलीतील सर्वच नाट्यगृहांची झालेली दुरवस्था. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षानेच ही वेळ आली आहे. मूलभूत सुविधाही इथे पुरवल्या जात नाहीत. जर मल्टीप्लेक्‍सला प्रेक्षक जातात तर नाट्यगृहात सर्व सोई उपलब्ध केल्या तर प्रेक्षक नाटक बघायला नक्की येतील. दुरवस्थेने नाटक इथं येत नसल्याने हॉटेल, लॉजसह अनेक व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

नाट्यचळवळीला उभारी देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. खेड्यात नाटक पोहोचवायचे असेल तर नाट्यवाचनासारखा उपक्रमही नाट्यसंस्थांनी राबवायला हवा. मराठमोळी लावणीही यात्रा-जत्रेपुरतीच उरली आहे. 

रुपेरी पडद्याच्या दुनियेत सांगलीकरांनी आपला ठसा कायम ठेवला आहे. नवी पिढी यात आकर्षित होत असून नवं करिअर म्हणून पाहिले जाते. पण, मल्टीप्लेक्‍सच्या दुनियेत चित्रपटगृह बंद झाल्याने सिनेमांची प्रमोशन होण्याचे प्रमाणही कमी झाले. निर्माते, दिग्दर्शकांचा सांगलीत नको.. असाच सूर असतो. मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक वळवण्यासाठी ‘रसिक प्रेक्षक’ योजना सुरू करण्याचा विचार आहे. वर्षातून सहा चित्रपट पहायला मिळतील. व्यावसायिकता आणि कलात्मकता यांच्या मिलाफातूनही ही चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. 

दुखणे काय..?
दिग्गजांच्या नावे असणाऱ्या नाट्यगृहांची दुरवस्था 
नाटक संस्थांची सातत्याने फिरवलेली पाठ 
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता 
नव्या पिढीशी नाटक जोडता आलं नाही
नाटकासाठी वार्षिक सभासद योजना बंद 
चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांचाही सांगलीला येण्याचा नकार.

जमेची बाजू काय?
तब्बल दोन दशकांनंतर आंतरमहाविद्यालयीन पीएनजी महाकरंडक एकांकिका स्पर्धा. 
महापालिकेतर्फे प्रथमच निमंत्रितांच्या गोवा व महाराष्ट्रीयस्तरीय एकांकिका स्पर्धा. 
श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचे ६२ वे वर्ष उत्साहात
ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांना विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान 

‘गुरुकुल’ची  यशस्वी वाटचाल 
संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गुरुकुल प्रतिष्ठानची स्थापना दोन वर्षांपूर्वी करण्यात  आली. ही सांगलीकरांसाठी भूषणावह आहे. आज २५ हून अधिक शिष्य शिक्षण घेताहेत. गायिका मंजूषा पाटील यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी वाटचाल सुरू आहे.

तज्ज्ञ म्हणतात

चित्रनगरीचे काम लवकरच पूर्ण होऊन तेथे चित्रीकरणाला प्रारंभ होईल. त्याशिवाय ‘एफटीआय’ सारखी संस्था कोल्हापुरात सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. चित्रीकरणासाठीचे परवाने असोत किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे परवाने एकाच खिडकीतून मिळावेत, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. 
- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

वेगाने विस्तारणारे मनोरंजन क्षेत्र आणि त्यातील संधींचा विचार करून आता कलाशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याबाबतच्या मार्गदर्शनावर अधिक भर दिला जातो आहे. कलाशिक्षणाची पदवी किंवा पदविका घेतल्यानंतर येथील अनेक विद्यार्थी इंटरनेटमेंट इंडस्ट्रीत जाऊन यशस्वी झालेत. सध्याच्या पिढीला मात्र बदलते तंत्र आत्मसात करणे आवश्‍यक आहे. 
- प्राचार्य अजय दळवी, दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूट

कोल्हापुरमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. निर्मात्यांना चित्रीकरणासाठी येथे यायला भाग पाडण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्याबाबत मार्केटींग महत्वाचे आहे. केवळ इतिहासात न रमता आपला वारसा पुन्हा नव्याने आणि तेवढ्याच प्रभावीपणे जगासमोर ठेवल्यास येथील इंडस्ट्रीला आणखी बळ मिळेल. त्यासाठी सध्याची पिढी सजगपणे काम करते आहे.
- भरत दैनी, लेखक-दिग्दर्शक

नाट्यपंढरीतील बाल गंधर्व आणि दीनानाथ मंगेशकर ही दोन नाट्यगृहे सांगलीकरांची अस्मिता आहे. त्यांच्या दूरवस्थेबाबत महापालिका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजनांची पूर्तता सुरू केली आहे. लवकरच ही नाट्यगृहे सुसज्य होतील. यानिमित्ताने येथील सांस्कृतिक चळवळीला उभारी देण्याचे काम महापालिका नक्की करेल.
- रवींद्र खेबुडकर, आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका.

तब्बल दोन दशकानंतर आंतरमहाविद्यालयीन पीएनजी महाकरंडक एकांकिका स्पर्धा यशस्वी झाली. तरुणाईवर प्रसार माध्यमांचा अधिक प्रभाव आहे. वृत्तपत्र, नाट्य चळवळ, चित्रपट यांचा हा वर्ग खेचला गेला आहे. त्यांना योग्य दिशा देण्याचे काम सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांनी करावे. यामध्येही करिअर करता येते हे तरुणाईला पटवून दिले पाहिजे.
- डॉ. भास्कर ताम्हणकर, प्राचार्य, विलिंग्डन महाविद्यालय

कोल्हापुरातील अनेक लोकेशन्स अद्यापही अपरिचित आहेत. त्याचे योग्य ते मार्केटिंग करून ती निर्मिती क्षेत्रातील विविध कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत पोचवली पाहिजेत. त्या दृष्टीने आता प्रयत्नही सुरू झाले आहेत. त्याशिवाय कोल्हापुरात चित्रीकरणासाठी येणाऱ्या निर्मात्यांना आवश्‍यक ती सर्वतोपरी मदत कोल्हापूरकर नेहमीच करत आले आहेत.    
- मिलिंद अष्टेकर, निर्मिती व्यवस्थापक

येथील तरुणाई प्रचंड टॅलेंट आहे. कोल्हापुरात हळूहळू त्यांना संधी उपलब्ध होत आहेत, मात्र त्याचबरोबरीने त्यांनी मुंबईसह देशभरात जाऊन आपला ठसा उमटवला आहे. या क्षेत्रात अनेक संधी आहेत, मात्र नव्या पिढीने प्रोफेशनली या संधींकडे पाहिले पाहिजे. या क्षेत्रात सुरवातीच्या काळात स्ट्रगल हा असतोच. त्यासाठी सज्ज असायलाच हवे.
- अजय कुरणे, कॅमेरामन

जिल्ह्यातील नमन-खेळे, दशावतार, पारावरची नाटके ही कोकणातील संस्कृतीची उत्तम उदाहरणे आहेत. कोकण प्रांत नाटकवेडा आहे. या भूमीने काशीनाथ घाणेकर आणि मच्छिंद्र कांबळी यांच्यासारखी रत्ने रंगभूमीला दिली. सध्याचे नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर याच भूमीतले; मात्र कलेला राजाश्रयही मिळणे आवश्‍यक आहे.
- सुनील ऊर्फ दादा वणजू, सहकार्यवाह, अ. भा. नाट्य परिषद, मध्यवर्ती शाखा.

नाट्यक्षेत्राकडे पालकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आगळा वेगळा आहे. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या तरुणाईची संख्या कमी आहे. साहजिकच नाट्यचळवळीला मरगळ आली आहे. तरुणाईने उत्तम करिअर म्हणून याकडे पाहिल्यास खूप फरक पडेल. त्यासाठी सातत्य ठेवायला हवे. यातील जाणकारांनी तरुणाई इकडे वळवण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत.
- प्रताप सोनाळे, रंगकर्मी, सांगली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cultural environment movement should